प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी ता. पलूस येथील ग्रामपंचायतीत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची दखल राज्य शासनाने घेतली असून येथील ग्रामसेवक सौ. स्वप्नगंधा सागर बाबर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार पुणे येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजित पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
सौ.बाबर ग्रामसेवक यांनी खंडोबाचीवाडी येथे मागील काही वर्षांत विविध विकास योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार 2021–22 अंतर्गत “गरीबीमुक्त व वर्धीत उपजीविका पंचायत” या गटात ग्रामपंचायतीने देशात प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रपती महामहिम यांच्या हस्ते सुमारे 1.00 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. तसेच आर.आर. आबा पाटील स्वच्छ व सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम व जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
याशिवाय माझी वसुंधरा अभियान 2.0 (2021–22) मध्ये जिल्ह्यात प्रथम व राज्यात आठवा क्रमांक, तर माझी वसुंधरा अभियान 4.0 (2023–24) मध्ये पुणे विभागात द्वितीय क्रमांक मिळवत पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कार्य केले आहे. यापूर्वीही सौ. बाबर ग्रामसेवक यांनी विविध ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता व विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सन 2007–2008 मध्ये कार्वे ता. खानापूर ग्रामपंचायतीला तर 2008–2009 मध्ये वाझर ता. खानापूर ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. तसेच कार्वे ता. खानापूर ग्रामपंचायतीला महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला असून त्यासाठी ३ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले होते. या सर्व कामांमध्ये ग्रामसेवक सौ. स्वप्नगंधा बाबर यांचे नियोजन,मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित केले आहे. या यशाबद्दल ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या