प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी मातीचा अभिमान आहेत, त्यांच्यावर गतकाळात झालेल्या लेखनाची मांडणी नव्या आकलनाने करत असताना शिवाजी अँड हिज टाईम्स या ग्रंथाचे झालेले पुनर्मूल्यांकन डॉ. कपिल राजहंस यांनी केले आहे. याच पद्धतीने शिवचरित्रातील महत्वाच्या इतिहासातील ऐतिहासिक इतरही ग्रंथांची सत्य समजून घेण्यासाठी नव्याने मांडणी होऊन त्याचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
ते निर्मिती प्रकाशन प्रकाशित सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. कपिल राजहंस लिखित शिवाजी अँड हिज टाईम्स सर जदुनाथ सरकार यांच्या शिवचरित्राचे पुनर्मुल्यांकन या महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचे प्रकाशन समारंभ प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक म्हणून कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.
यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीचे प्रा. डॉ. मिलिंद आवाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा रयतेचा इतिहास होता. त्यांनी सर्व सामान्य विविध जाती समूहातील लोकांना एकत्र घेऊन आपल्या स्वराज्याची निर्मिती केली. त्यांच्यावर अनेक इतिहासकारांनी लिहिले असले तरी त्याची सत्यता पडताळून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेतले पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल म्हमाने म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचा इतिहास सर्व परिचित असून तो सर्वांनी समजून घेतलाच पाहिजे. परंतु त्यांची विविध क्षेत्रातील कामगिरी देखील समजून घेणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीत बंदिस्त करून त्यांची उंची कमी करणे योग्य होणार नाही.
यावेळी सुनिल जाधव, विश्वासराव तरटे, मिलिंद यादव, सिद्धार्थ तामगावे, जयश्री भाटले, गंगाधर म्हमाने, तुषार नाईकनवरे, महेश तरटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. टी. के. सरगर यांनी तर सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर, अर्हंत मिणचेकर यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या