प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मानवतावाद जोपासण्याच्या दृष्टिकोनातून मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने 25 जानेवारीला सकाळी 10:30 वा. मुस्लिम बोर्डिंग हॉल, दसरा चौक, कोल्हापूर येथे ज्येष्ठ साहित्यिक, दिग्दर्शक आणि निर्माते अॅड. डॉ. रमेश विवेकी यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या राष्ट्रीय स्तरावरील एकदिवशीय मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने घेण्यात येणार्या प्रबोधनपर वैचारिक व सैद्धांतिक अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या मानाच्या व सन्मानाच्या 'मानवतावादी' जीवन गौरव पुरस्कारासाठी साहित्य, कला व प्रबोधनाच्या क्षेत्रातील मानवतावादी भूमिका घेऊन करीत असलेल्या दखलपात्र योगदानाची नोंद घेऊन कोल्हापूरचे ज्येष्ठ मानवतावादी साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे आणि नाशिकचे भारतीय संविधानाचे अभ्यासक, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रा अँड गोव्याचे मा. चेअरमन अॅड. जयंत जायभावे यांना जाहीर झाला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांनी दिली.
सदर संमेलनास देशभरातून दोन हजारहून अधिक प्रागतिक विचारांचे साहित्य व कलेच्या क्षेत्रातील कवी, लेखक, साहित्यिक, समीक्षक, कलावंत, कार्यकर्ते, नेते उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनात मानवतावादी साहित्य आणि कला यावर हितगुज व चर्चा होणार आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे हे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, संपादक, अनुवादक, सामाजिक कार्यकर्ते, स्मृतीसंग्रहालयाचे निर्माते, अनेक संस्थांचे आधारवड, एक कृतिशील विचारवंत म्हणून सुपरिचित आहेत. खाली जमीन वर आकाश, आत्मस्वर, सरल्या ऋतूचं वास्तव, मी या काळात नाही! यासह शंभरहून अधिक ग्रंथाचे लेखन व संपादन त्यांनी केले असून मानवतावादी प्रबोधनकार म्हणून त्यांना जगभर ओळखले जाते. रोल ऑफ ऑनर, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका साहित्य पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राष्ट्रीय पुरस्कारासह मानाचे, सन्मानाचे 200 हून अधिक पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत.
अॅड. जयंत जायभावे हे ज्येष्ठ विधीज्ञ असून भारतीय संविधानाचे अभ्यासक व विश्लेषणकार म्हणून त्यांना ओळखले जाते. भारतीय संविधानातील लोकमंत्र, लॉ अँड लाइफ, फिफ्टी जजमेंट ऑफ जस्टीस श्री. भूषण आर. गवई या महत्वपूर्ण ग्रंथासह 50 हून अधिक ग्रंथाचे लेखन व संपादन त्यांच्या नावे असून कष्टकरी जनतेच्या बाजूची भूमिका घेणारे आणि न्यायदानामध्ये योगदान देणारे सर्वसामान्यांचे वकील म्हणून त्यांना ओळखले जाते. परिवर्तनवादी डाव्या विचारसरणीचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात समतावादी भूमिका घेऊन महत्वपूर्ण कार्य केले आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रा अँड गोव्याचे ते माजी चेअरमन असून वकिलांच्या विकासासाठी त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. लक्षवेधी अभ्यासू कायदेतज्ञ म्हणून त्यांना जगभर ओळखले जाते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्रासह देशभरातील 40 हून अधिक मानाचे, सन्मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.
पत्रकार परिषदेला सुरेश केसरकर, लालासाहेब नाईक, गंगाधर म्हमाने, अर्हंत मिणचेकर, सुनिल जाधव, विश्वासराव तरटे, सिद्धार्थ तामगावे, अभिजीत मासुर्लीकर, सिद्धार्थ कांबळे, आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर आदी उपस्थित होते.
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ
9822472109
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या