प्रतिष्ठा न्यूज/ हातकणंगले प्रतिनिधी
कुंभोज रयत शिक्षण संस्थेच्या रयत गुरुकुल पब्लिक स्कूल, कुंभोज येथे अक्षरशाळा हस्ताक्षर वर्ग यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात सुंदर व सुबक हस्ताक्षराला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात वाचन, भाषण व श्रवण यासोबतच लेखन कौशल्यही तितकेच महत्त्वाचे आहे. प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांच्या हाताला योग्य लेखनवळण लागावे, अक्षरलेखनातील मूलभूत आकारांची ओळख व्हावी आणि त्यातून सुंदर हस्ताक्षर विकसित व्हावे, या उद्देशाने शाळेच्या वतीने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याध्यापक श्री. सागर माने यांनी सांगितले.
शाळेचे माध्यम इंग्रजी असले तरी मराठी ही आपली मातृभाषा असून तिच्या वळणदार व शुद्ध लेखनासाठी लेखन कौशल्य दृढ होणे आवश्यक आहे. या दृष्टीने ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायक असल्याचे मत मराठी विषय शिक्षिका सौ. मनिषा भंडारी यांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेत अक्षरशाळा हस्ताक्षर वर्गाचे संस्थापक व सुलेखनकार श्री. सागर रावळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुंदर हस्ताक्षर हे व्यक्तिमत्व विकास व परीक्षेच्या मूल्यमापनातील एक महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी नमूद करत सुंदर हस्ताक्षरासाठी आवश्यक असलेली पंचसूत्री विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी प्राथमिक स्तरावर आवश्यक असणारे मूलभूत आकार, हाताचे वळण, पेन पकडण्याची योग्य पद्धत, लेखन करताना घ्यावयाची बैठक, विविध लेखन साहित्याचा वापर, लेखनाच्या विविध पद्धती, आशयघन शब्दलेखन तसेच शुद्धलेखनाचे नियम याबाबत सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः वैयक्तिक मार्गदर्शन, लेखन पूर्वतयारी, बोर्ड परीक्षेतील उत्तरपत्रिका लेखन तंत्र तसेच हस्ताक्षर स्पर्धांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. संगिता चांदोबा तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या