प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : व्यसनमुक्तीचा संदेश देणारे आणि डान्सबार बंदीचा निर्णय घेणारे स्वर्गीय आर.आर. पाटील (आबा) यांच्या पुतळ्या समोरच दारूचे दुकान सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.हे दुकान कायमस्वरूपी बंद अथवा अन्यत्र स्थलांतरित करण्याबाबत तातडीने विशेष सभा आयोजित करावी, अशी मागणी तासगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी केली आहे.याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात पैलवान यांनी म्हटले आहे की,आर.आर. आबांनी संपूर्ण महाराष्ट्राला व्यसनमुक्तीचा संदेश देत सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली.मात्र,त्यांच्याच पुतळ्यासमोर दारूची विक्री सुरू असून,काही मद्यपी दारू खरेदी करून पुतळा परिसरातील कट्ट्यावर बसून मद्यपान करतात. त्यामुळे हा प्रकार आबांच्या विचारांचा व कार्याचा अवमान करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.दारू खरेदीसाठी येणारी वाहने मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.तसेच नशेत असलेल्या व्यक्तींमुळे महिला,विद्यार्थिनी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून तसेच नगरपरिषदेच्या विशेष प्रयत्नांतून या परिसरातील अतिक्रमणे हटवून परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला होता.मात्र, दारूच्या दुकानामुळे या परिसराच्या मूळ उद्देशालाच बाधा येत असल्याचे पैलवान यांनी नमूद केले.या प्रश्नावर नगरपरिषदेच्या मासिक सभेत चर्चा करून दारूचे दुकान स्थलांतरित करण्याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. सामाजिक वातावरण दूषित होण्यापासून रोखण्यासाठी तसेच भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी नगरपरिषदेची विशेष सभा तातडीने बोलवून दुकान कायमस्वरूपी बंद अथवा स्थलांतरित करण्याबाबत निर्णय घ्यावा,अशी मागणी प्रसाद पैलवान यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या