प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज: भारताच्या राष्ट्रपतींच्या मान्यतेने भारतीय माहिती तंत्रज्ञान, डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग संस्था (IIITDM), कांचीपुरमच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या (BoG) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार प्रा. (सेवानिवृत्त) डॉ. अशोक खाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. खाडे हे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT-PPP), भागलपूरचे अध्यक्ष आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या टेक्निकल सेक्शन-१, शास्त्री भवन, नवी दिल्ली येथून ३ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला. आदेशानुसार डॉ. खाडे यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार तात्काळ प्रभावाने देण्यात आला असून, पुढील सहा महिने, नियमित अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत किंवा पुढील आदेश जारी होईपर्यंत—यापैकी जे आधी होईल तोपर्यंत ते या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
IIIT कायदा, २०१४ तसेच IIITDM कांचीपुरमच्या संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार या नियुक्तीच्या इतर अटी व शर्ती लागू राहणार आहेत. या नियुक्तीचा आदेश संचालक गरिमा शर्मा यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला असून, त्याची प्रत राष्ट्रपती भवन सचिवालयालाही पाठविण्यात आली
आहे.प्रा. डॉ. अशोक खाडे यांची ही नियुक्ती सांगली मिरजच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या तांत्रिक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल सांगली-मिरज परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे परिसराच्या शैक्षणिक लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या