प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील रखडलेल्या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती देण्यासाठी आमदार रोहित पाटील यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.विटा-संकेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या निविदा प्रक्रियेला गती देण्यासह तासगाव रिंगरोडच्या अलाइनमेंटमध्ये स्थानिकांच्या हितासाठी आवश्यक बदल करण्याची मागणी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.गुरुवारी (दि.३) झालेल्या या भेटीत मतदारसंघातील रस्ते विकासाशी संबंधित विविध प्रश्न गडकरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.विटा-संकेश्वर राष्ट्रीय महामार्गाचा डीपीआर अंतिम टप्प्यात असल्याने उर्वरित प्रक्रिया तातडीने पूर्ण करून निविदा काढावी आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी,अशी आग्रही मागणी रोहित पाटील यांनी केली.
या महामार्गामुळे परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होण्याबरोबरच शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.त्यामुळे प्रकल्पाला अनावश्यक विलंब होऊ नये,अशी भूमिका त्यांनी मांडली.
*रिंगरोडच्या अलाइनमेंटवर शेतकऱ्यांची बाजू*
तासगाव शहरातून प्रस्तावित रिंगरोडच्या अलाइनमेंटबाबत स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या हरकती असून,काही भागातील शेतजमिनींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.विकासाला विरोध नसून शेतकरी व नागरिकांचे नुकसान कमीत कमी व्हावे, यासाठी रिंगरोडच्या अलाइनमेंट मध्ये आवश्यक अंशतः बदल करावा,अशी मागणी शेतकरी व नागरिकांच्या शिष्टमंडळासह रोहित पाटील यांनी केली.
नरसिंहगाव-जत मार्गालाही गतीची मागणी
नरसिंहगाव-कवठेमहांकाळ-जत मार्गाचा डीपीआर अंतिम टप्प्यात असून, त्यातील तांत्रिक त्रुटी दूर करून मंजुरीची प्रक्रिया जलद करण्याची मागणीही केंद्रीय मंत्र्यांकडे करण्यात आली. याशिवाय नागज येथे वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी भवन उपलब्ध करून देण्याचा प्रश्नही गडकरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.मतदारसंघातील रखडलेले रस्ते प्रकल्प मार्गी लागावेत, विकासकामांना गती मिळावी आणि त्याचवेळी स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी दिल्ली पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आमदार रोहित पाटील यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या