सांगली प्रतिनिधी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाड्या वस्त्यांवर लाखो लोक राहतात. तिथे तुम्ही रोज सहा-सहा तास भारनियमन करताय. लोकांची परीक्षा पाहू नका. मुलांचा अभ्यास, वस्तीवरील लोकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. दोन ठिकाणी लहान मुले साप चावून मेली, काय भरपाई करणा आहोत आपण, अशा शब्दांत खासदार विशाल पाटील यांनी आज महावितरण अधिकाऱ्यांसमोर संताप व्यक्त केला.
आता एकच टार्गेट ठेवा, पुढील काही दिवसांत जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांना गावठाण फिडरशी ‘सिंगल फेज’ने जोडा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून मिळणाऱ्या ५० कोटी रुपयांचा प्राधान्याने विनियोग करण्याचा आग्रह मी पालकमंत्र्यांकडे करेन. सर्व आमदारही त्याला पाठबळ देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हा विद्युत समितीची बैठक खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, कोल्हापूर परिमंडलचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, अधीक्षक अभियंता अमित बोकील, पूनम रोकडे, कार्यकारी अभियंता तृप्ती दीपनकर, आशिष मेहता, युवराज पाटील, विजय पाटील, सौरभ माळी, सुरेश पाटील उपस्थित होते.
खासदार पाटील आणि आमदार देशमुख यांनी वाड्या वस्त्यांवर रोज होत असल्याच्या भारनिमयनाबाबत संताप व्यक्त केला. गणपती उत्सवात अंधारात महाप्रसाद सुरु आहेत, मुलांना अभ्यास करता येईल, लोक सुरक्षित नाहीत, बिबटे, कोल्हे, सापांची भिती आहे, किती दिवस लोकांना अंधारात ठेवणार आहात, असा आक्रमक पवित्रा दोघांनी घेतला. गावठाणात स्वतंत्र लाईन टाकली आहे, तिथे भारनियम नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता गावठाणासह ज्या वाड्या वस्त्या आहेत, त्या ठिकाणी गावठाण फिडरवरून सिंगल फेज विद्युत लाईन टाकायला प्राधान्य देऊ, अशी आग्रही भूमिका खासादरांनी मांडली.
बैठकीत महत्वाच्या सूचना
- सुशिक्षित बेरोजगारांना महावितरणने कामे द्यावीत, उमद्या तरुणांच्या हाताला बळ देणारे धोरण राबवावे, त्यासाठी आवश्यतेनुसार लवचिकता ठेवावी.
- स्मार्ट मीटरबाबत स्पष्टता नाही. ती महावितरणने केलीच पाहिजे, लोकांचा संताप का होतोय. रेटून मीटर बसवाल तर विरोध होणार. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय सक्ती करू नका.
- सौरऊर्जा प्रकल्प कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून बस थांबे उभे करावेत.
- कोणाच्याही शिफारशीने खासगी लाईन शिफ्टिंगसाठी शासकीय निधी वापरू नका.
- सौरऊर्जा प्रकल्पाचे काम एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ट्रान्सफर होणे संशयास्पद, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार
---------
गायरान देणं थांबवा
सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी खासगी कंपन्यांना गायरान जमिनी वाटल्या जात आहेत. त्यावर खासदार विशाल पाटील यांनी आक्षेप घेतला. या कंपन्यांना सरकारी जमिनी का देताय? त्यांना खासगी जमिनी घेऊ द्या. गायरान जमिनी लोकांच्या कामाच्या आहेत, त्या संपवू नका, अशी भूमिका त्यांनी मांडली. ज्या ठिकाणी प्रकल्पाच्या गरजेपेक्षा अधिक जमिनी दिल्या आहेत आणि त्या पडून असतील तर परत शासनाकडे घ्या, या त्यांच्या मागणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अशा सर्व प्रकल्पांचे ‘ड्रोन सर्वे’चे आदेश दिले.
--------------
मनमानी भरपाई मागणी
सांगली शहरात महावितरणच्या विस्तार कामासाठी महापालिकेकडून ७५ लाख रुपयांची भरपाई मागितली जात आहे. यात फक्त १६ लाखांची लाईन टाकली जाणार आहे. त्याची भरपाई एवढी कशी द्यायची? नगरविकास विभागाच्या अद्यादेशाप्रमाणे आकारणी करा, अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आयुक्त संजिता महापात्र यांना तातडीने कार्यवाही करून योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या