प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : प्लास्टिकमुक्त स्वयंपाकघर साकारण्याचा संकल्प महिलांनी करावा. स्वयंपाकघर प्लास्टिकमुक्त झाले तर टप्प्याटप्प्याने घर आणि त्यानंतर संपूर्ण समाज प्लास्टिकमुक्त होऊ शकतो, असे प्रतिपादन अदम्य चैतन्य संस्थेच्या प्रमुख तेजस्विनी अनंतकुमार यांनी केले.
विजयपूर येथील श्री शिवचिदंबर मंदिरात श्री चिदंबर सेवा समितीच्या नेतृत्वाखाली श्री शिवचिदंबर महास्वामींच्या अप्रकाशित लीलाग्रंथाच्या पठणाच्या 50 व्या वर्षाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महिला गोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते. या गोष्ठीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना तेजस्विनी अनंतकुमार यांनी प्लास्टिकमुक्ती, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
प्लास्टिक निसर्गासाठी अत्यंत घातक असून, त्यातील विषारी घटक सातत्याने बाहेर पडत असतात. त्यामुळे प्लास्टिकमुक्त समाज निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आणि संकल्प असला पाहिजे. स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, वस्तू तसेच अन्नसाठवणुकीसाठी प्लास्टिकवरील अवलंबित्व पूर्णपणे कमी केले पाहिजे. महिलांनी पुढाकार घेतल्यास ही मोहीम प्रभावीपणे यशस्वी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
महिला ही समाजातील श्रेष्ठ शक्ती असून, त्यांनी कोणत्याही आव्हानांना न घाबरता त्यांचा समर्थपणे सामना करून पुढे जावे. महिलांनी आध्यात्मिक कार्यात अधिकाधिक सहभागी व्हावे तसेच ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ मानून स्वतःच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी म्हणाले की, मुलांमध्ये संस्कार रुजविण्याची मोठी जबाबदारी मातांवर आहे. त्यामुळे बालपणापासूनच मुलांच्या मनात आपल्या पवित्र हिंदू संस्कृतीची मूल्ये आणि संस्कार रुजविण्याचे कार्य मातांनी करावे.
यावेळी सिंदगी येथील श्री भीमाशंकर मठाचे श्री सदाशिव अप्पय्या महास्वामीजी, श्री वल्लभ स्वामीजी आणि श्री सदानंद स्वामीजी यांचे सान्निध्य लाभले. ‘शिक्षण आणि अध्यात्मिकता’ या विषयावर डॉ. राघवेंद्र कुलकर्णी यांनी व्याख्यान दिले. बागलकोट येथील उद्यानविद्या विद्यापीठाचे कुलसचिव बालाजी कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्प अंगडी, श्री चिदंबर सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष अंबादास जोशी, सचिव वेदमूर्ती व्यंकटेश भट अग्निहोत्री, व्यंकटेश जोशी, व्ही. सी. कुलकर्णी, सी. के. कुलकर्णी, विजय जोशी, व्यंकटेश जोशी, मुकुंद हंगरगी, चिदंबर जोशी, रोळी सुधींद्र कुलकर्णी, व्यंकटेश जोशी हडलिगेरी, उपेंद्र देसाई आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या