प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तालुक्यातील वायफळे परिसरासह लगतच्या अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सकाळी आणि रात्रीच्या वेळी अवेळी भारनियमन केले जात असल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे.विशेषतः मळे भागात सकाळी दोन ते तीन तास,तर रात्री तब्बल पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गावभागात वीजपुरवठा सुरळीत ठेवला जात असताना मळे भागातच वारंवार वीज बंद केली जात असल्याने महावितरणकडून गावभाग आणि मळे भाग असा दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वायफळे परिसरातील शेतकऱ्यांनी आज सायंकाळी वायफळे येथील महावितरणच्या वीज उपकेंद्रावर धडक देत तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला.यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्राला टाळे ठोकून आपला आक्रोश व्यक्त केला.भारनियमनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, मळे भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा आणि शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून वायफळे परिसरात सकाळी व रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद केला जात आहे. प्रामुख्याने मळे भागातील वीज बंद होत असल्याने शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.कडबा कुट्टी मशीन चालविणे,जनावरांच्या धारा काढणे, जनावरांना वैरण टाकणे ,पाणीपुरवठा करणे तसेच शेतीतील अन्य कामे करण्यासाठी वीज आवश्यक असताना नेमक्या याच वेळेत वीज गायब होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.‘गावभागात एक मिनिटही वीज बंद होत नाही; मग मळे भागातील शेतकऱ्यांवरच अन्याय का?’ असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला.गाव आणि मळे भागातील वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात समानता ठेवावी,अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
*रात्री वीज बंद असल्याने चोरांचा धुमाकूळ..!*
वायफळे परिसरात सध्या चोरट्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी मळे भागात वीजपुरवठा बंद असल्याचा फायदा चोरटे घेत असल्याचा आरोप करण्यात आला. परिसरातील काही ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून, अंधारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याशिवाय मळे भागात घोणस, नाग तसेच अन्य विषारी सापांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने रात्रीच्या वेळी वीज बंद असणे शेतकऱ्यांच्या जीवितासाठीही धोकादायक ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वेळेतही वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यांच्याही शिक्षणावर परिणाम होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
*महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब*
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज वायफळे येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा वळविला.यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरत भारनियमनाबाबत जाब विचारला. वीजपुरवठा बंद करण्याचे नेमके कारण काय,मळे भागातच वारंवार वीज का बंद केली जाते, याचे वेळापत्रक काय आहे, असे अनेक सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केले.यावेळी कार्यालयातील ऑपरेटरने वायफळे महावितरण कार्यालयाचे प्रमुख अधिकारी फडतरे हे गेल्या महिनाभरापासून कामावर आले नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितल्याचे समजते.मात्र, शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याचे हजेरी रजिस्टर तपासण्याची मागणी केली.त्यावेळी रजिस्टरमध्ये गेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत संबंधित अधिकारी गैरहजर असल्याची नोंद नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित अधिकारी प्रत्यक्ष कामावर उपस्थित नसतानाही हजेरी लावली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला.
या प्रकारामुळे शेतकरी अधिकच संतप्त झाले. संबंधित अधिकाऱ्याच्या कामकाजाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्याची तातडीने बदली करावी, अशी मागणीही करण्यात आली.
*‘भारनियमन बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन’..!*
मळे भागातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक पद्धतीने भारनियमन लादले जात असल्याचा आरोप करत यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. महावितरणने तातडीने भारनियमनाचे वेळापत्रक स्पष्ट करावे, मळे भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, गावभाग आणि मळे भागातील वीजपुरवठ्यातील दुजाभाव थांबवावा आणि संबंधित अधिकाऱ्याची बदली करावी, अशी मागणी करण्यात आली.महावितरणच्या कारभारात तातडीने सुधारणा झाली नाही, तर यापुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला.दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम असल्याने वायफळे परिसरातील महावितरणच्या कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या