प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगलीच्या वेलणकर सभागृहात महाविद्यालयाच्या ‘चिंतामणीज’ या ६६ व्या वार्षिक अंकाचे प्रकाशन तसेच डी.ई.एस. संस्थेअंतर्गत महाविद्यालयांसाठी आयोजित लोकमान्य टिळक निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या निबंध स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील ५५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमास ‘तरुण भारत’चे संपादक शिवराज काटकर प्रमुख उपस्थित होते. त्यांनी १६० पानी ‘चिंतामणीज’ अंकाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या लेखनातून दिसून येणारी वैचारिक प्रगल्भता आणि विविध विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधोरेखित केला. विद्यार्थ्यांनी वाचनासोबत लिखाणाची सवय जोपासावी, असे आवाहन करत गुणवत्तापूर्ण लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘तरुण भारत’च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.ई.एस.चे सीडीसी चेअरमन अमित कुलकर्णी होते. यंदाच्या ‘चिंतामणीज’ची ‘AI in Commerce and Management’ ही संकल्पना भविष्योन्मुख असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेकडे भीतीने नव्हे, तर संधी म्हणून पाहून तिचा योग्य व जबाबदारीने उपयोग करावा, असे आवाहन केले. महाविद्यालयीन जीवनातील अभ्यासासोबत विविध उपक्रमांत सहभागी होऊन वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
प्रा. स्वप्ना अभिजित उदगांवकर यांच्या संपादनाखाली प्रकाशित झालेला १६० पानी ‘चिंतामणीज’ अंक कृत्रिम बुद्धिमत्ता, वाणिज्य, व्यवस्थापन यांसह विविध विषयांवरील विद्यार्थ्यांचे लेख, विचार आणि सर्जनशील साहित्याने समृद्ध झाला आहे. माजी विद्यार्थी म्हणून ज्या मॅगझिनचे पूर्वी वाचन केले, त्याच अंकाच्या संपादनाची जबाबदारी पार पाडता येणे हा आनंद आणि अभिमानाचा अनुभव असल्याचे प्रा. उदगांवकर यांनी सांगितले.
लोकमान्य टिळकांच्या विचारांचा व बहुआयामी कार्याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, तसेच त्यांच्यात वाचन, लेखन आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने टिळक जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली. ‘लोकमान्य टिळकांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान’, ‘गीतारहस्य’, ‘ओरायन – लोकमान्य टिळकांचा गणिती अभ्यास’ आणि ‘The Arctic Home in the Vedas’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी लेखन केले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक सादिया अकबर पठाण (चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली), द्वितीय क्रमांक कशिश हारून चौगुले (राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली) यांनी मिळविला. तृतीय क्रमांक समृद्धी सुधीर कुलकर्णी (चिंतामणराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च) आणि शुभश्री सुनील शिंदे (राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय) यांनी विभागून मिळविला.
उत्तेजनार्थ पारितोषिके मयुरी कुमार वावरे आणि गुरुनाथ शिरीष पाटवर्धन यांना विभागून देण्यात आली.
स्पर्धेबाबतची माहिती सी.ए. श्रावणी देशपांडे यांनी दिली, तर निकाल प्रा. ऐश्वर्या कुलकर्णी यांनी जाहीर केला. प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सिद्धिविनायक शिंदे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. सुप्रिया सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुशील बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात डी.ई.एस.चे आजीव सभासद नारायण आपटे व डॉ. आशिष पुराणिक यांचा सक्रिय सहभाग लाभला.
विद्यार्थ्यांच्या लेखणीला विचारांचे व्यासपीठ देणारा ‘चिंतामणीज’चा १६० पानी अंक आणि लोकमान्य टिळकांच्या विचारांचा अभ्यास घडविणारी निबंध स्पर्धा, या दोन्ही उपक्रमांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या