प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शिक्षण क्षेत्रावर आज राजकीय गंडांतर येण्याची भीती निर्माण झाली असून,शिक्षण क्षेत्रातील ही विकृती वेळीच रोखण्यासाठी शिक्षकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे,असे रोखठोक मत माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी व्यक्त केले.
तासगाव येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ), माध्यमिक शिक्षक संघ आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श संस्था, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते.
माजी मंत्री घोरपडे म्हणाले, सामान्य जनतेपर्यंत शिक्षण पोहोचावे या उद्देशाने शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या. मात्र आज शिक्षण क्षेत्रात विकृत मनोवृत्तीचे ‘विद्यापीठ’ तयार होताना दिसत आहे. ही विकृती वेळीच आवरली पाहिजे.शासन याकडे गांभीर्याने पाहीलच असे नाही; त्यामुळे शिक्षकांनी संघटित होऊन त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजाला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षण क्षेत्रच करू शकते. तरुण, शिक्षक आणि संस्थाचालकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्न करतील, त्यांना सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी विनाअनुदान धोरणामुळे शिक्षण क्षेत्राची अधोगती झाल्याचे सांगितले.राज्यात मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग व मेडिकल महाविद्यालये सुरू झाली;मात्र देणगीवर आधारित शिक्षण व्यवस्थेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्वप्ने मागे पडत आहेत.शिक्षण खात्यात भ्रष्टाचार वाढला असून, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात लढण्यासाठी राजकारणात चांगली माणसे येणे गरजेचे आहे.संस्थेने आणि टीडीएफने याच भूमिकेतून वेगळा विचार स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली. शिक्षकांनी पिढ्या घडविण्याचे काम केले असून त्यांच्या त्यागाला समाजात मोठे महत्त्व आहे.मात्र शाळांमध्ये आजही भौतिक सुविधांचा अभाव आहे. ‘पवित्र’ प्रणालीबाबत प्रश्न उपस्थित करताना पेपरफुटीच्या घटना घडत असताना खरे आरोपी बाजूला राहतात आणि शिक्षकांवर परीक्षा सक्ती लादली जाते,अशी टीका त्यांनी केली.संस्थाचालकांचे अधिकार कमी करणे,शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा टाकणे आणि नोकऱ्यांवर गदा आणणे,यामुळे शिक्षण व्यवस्था अडचणीत आली आहे. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रतिष्ठेसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे. टीईटी सक्तीचा निर्णय शिक्षकांसाठी असेल, तर संबंधित अधिकारी व पोलिसांनाही त्यांच्या पात्रतेबाबत समान निकष लागू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.‘सर्वात तरुण विधानपरिषदेचा आमदार निवडून द्या; संधीचे सोने करून दाखवू’, असे आवाहन करत गावडे म्हणाले, टीडीएफ आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था जेव्हा-जेव्हा एकत्र आल्या,तेव्हा आमदार निवडून आला आहे. आगामी काळातही संघटित ताकदीच्या जोरावर विजय मिळवू. शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त होईपर्यंत आपण शांत बसणार नाही,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.टीडीएफचे प्रदेशाध्यक्ष जी.के.थोरात यांनी संघटनेच्या बळावर शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे काम केल्याचे सांगितले.
संस्था चालविणे दिवसेंदिवस कठीण होत असून विद्यार्थी, शिक्षक आणि वेतनेतर अनुदानाच्या प्रश्नांमुळे अनेक संस्था अडचणीत आहेत. शिक्षकांना शाळाबाह्य कामे करावी लागत असून, संस्था व शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले प्रतिनिधी विधानपरिषदेत असणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि टीडीएफ एकत्र आली असून, संघटनेचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश काका पाटील, प्राचार्य अशोक पवार, प्राचार्य प्रकाश हाके, विद्यासमिती अध्यक्ष डॉ. श्रीराम साळुंखे, प्राचार्या डॉ. श्रुती जोशी, रोहन पाटील, के. एस. ढोमसे आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश एस.पाटील यांनी केले. आभार प्राचार्य डॉ.एल.जी.यादव यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल, प्रा.किशोर पाटील व प्रा.साधना पाटील यांनी केले.यावेळी स्वामी रामानंद भारती विद्यामंदिरचे प्राचार्य व टीडीएफचे जिल्हाध्यक्ष डॉ.परमानंद भोसले यांच्यासह विविध शाखांचे मुख्याध्यापक, पुरस्कारप्राप्त शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी तसेच शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ. सुरेश पाटील, प्रा.डॉ.परमानंद भोसले व टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या