सांगली प्रतिनिधी : पत्रकारिता क्षेत्रातील धावपळीचे जीवन, अनियमित वेळा आणि सततचा मानसिक ताण लक्षात घेऊन सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि स्पंदन हृदयालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हृदय तपासणी शिबिराला पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सव्वाशेहून अधिक पत्रकारांची हृदय तपासणी करण्यात आली.
स्पंदन हृदयालय, सांगली-मिरज रोड, मिरज येथे आयोजित या शिबिरात डॉ. रियाज मुजावर यांनी पत्रकारांची तपासणी केली. यावेळी ईसीजी, रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आदींची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांकडून पत्रकारांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.
पत्रकारांचे आरोग्य हे त्यांच्या कुटुंबासोबतच समाजासाठीही महत्त्वाचे आहे. बातम्यांच्या शोधात दिवसरात्र धावपळ करणाऱ्या पत्रकारांकडून अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज काटकर, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे, डिजिटल मिडिया पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य तानाजीराजे जाधव, कुलदीप देवकुळे, बलराज पवार, अविनाश कोळी यांच्यासह संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी आणि आरोग्यविषयक जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
“पत्रकार समाजाच्या आरोग्याची, समस्यांची आणि प्रश्नांची सातत्याने दखल घेतात; मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पत्रकारांसाठी आरोग्य तपासणीसारखे उपक्रम सातत्याने राबविणे आवश्यक आहे,” अशी भावना उपस्थित डॉ.रियाज मुजावर यांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या