प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:दुष्काळाच्या झळांनी शेतकरी हवालदिल झाला असून पाणी, वीज आणि पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामीण भागावरील संकट दूर व्हावे,यासाठी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित आर. आर. पाटील हे अंजनी ते तासगाव असा पायी प्रवास करीत गणरायाच्या चरणी साकडे घालणार आहेत.मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता अंजनी येथून या पायी प्रवासाला सुरुवात होणार असून, तासगाव येथील ऐतिहासिक श्री गणपती मंदिरात प्रवासाची सांगता होणार आहे. तासगावच्या ऐतिहासिक रथोत्सवानिमित्त हा पायी प्रवास आयोजित करण्यात आला आहे.मतदारसंघातील ग्रामीण भागात पाणीटंचाई, शेतीसाठी अपुरा वीजपुरवठा तसेच जनावरांसाठी चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे दुष्काळाचे सावट दूर व्हावे, कोरड्या शिवारात पुन्हा हिरवाई फुलावी, शेतीला मुबलक पाणी व वीज मिळावी आणि मुक्या जीवांचे चारा-पाण्याचे संकट दूर व्हावे, यासाठी आमदार रोहित पाटील गणरायाच्या चरणी प्रार्थना करणार आहेत.अंजनी येथून सुरू होणारा हा पायी प्रवास तासगावच्या ऐतिहासिक श्री गणपती मंदिरात पोहोचेल. रथोत्सवाच्या मंगलमय वातावरणात गणरायाचे दर्शन घेत दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे.दुष्काळाच्या संकटात शेतकरी प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करीत असताना, आमदार रोहित पाटील यांचा हा पायी प्रवास शेतकरी आणि ग्रामीण जीवनाशी जोडलेल्या भावनांना धार्मिक व सामाजिक स्वर देणारा ठरणार आहे.
चौकट : गणरायाकडे साकडे...
“शिवार पुन्हा हिरवेगार होऊ दे, पाण्याचे संकट दूर होऊ दे, शेतीला पुरेशी वीज मिळू दे, मुक्या जीवांना चारा-पाणी मिळू दे आणि शेतकरी कुटुंबांच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धी नांदू दे...” अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या