प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : जी. एच. रायसोनी, नागपूर व कल्पना फाउंडेशन, नागपूर पुरस्कृत, सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच H2E पॉवर सिस्टिम प्रस्तुत १५ वर्षांखालील खुली व मुलींची स्वतंत्र फिडे रेटिंग निवड बुद्धिबळ स्पर्धा सांगलीतील रेशीमगाठी सांस्कृतिक हॉल, स्फूर्ती चौक येथे सुरू आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून सहावी फेरी सुरू होती.
महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांतून निवड झालेले तब्बल २५० खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले आहेत. खुल्या गटात ११४ आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त व ५६ इतर खेळाडू, तर मुलींच्या गटात ५० आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त व २८ बिगरमानांकित खेळाडू सहभागी झाल्याने स्पर्धेला मोठी रंगत आली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होण्याच्या उद्देशाने प्रत्येक खेळाडू अत्यंत चुरशीने सामने खेळत आहे.
खुल्या गटात अर्जुन सिंग आघाडीवर
पाचव्या फेरीनंतर मुंबईचा अर्जुन सिंग याने पाच गुणांची कमाई करत खुल्या गटात आघाडी घेतली आहे. ठाण्याचा अथर्व सोनी यानेही पाच गुण मिळवत त्याला कडवी टक्कर दिली आहे. आयान सोमानी आणि विवान सोनी प्रत्येकी साडेचार गुणांसह संयुक्तपणे आघाडीच्या स्थानावर आहेत. तर अभिलाष यादव आणि अथर्व थट्टे प्रत्येकी चार गुणांसह आघाडीच्या शर्यतीत आहेत.
मुलींच्या गटात निहिरा कौलची आघाडी
मुलींच्या गटात पाचव्या फेरीनंतर निहिरा कौल हिने साडेचार गुणांसह आघाडी मिळवली आहे. सई पाटील आणि सान्वी गोरे यांच्याही खात्यात साडेचार गुण असून त्या आघाडीच्या शर्यतीत आहेत. भूमिका वागळे, सम्रादणी पाटील आणि आदिना मोहंती प्रत्येकी चार गुणांसह पुढील स्थानांसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
उद्या, रविवार, स्पर्धेचा अंतिम दिवस असून उर्वरित दोन फेऱ्या खेळविण्यात येणार आहेत. त्यामुळे अंतिम निकालासाठी शेवटच्या फेऱ्यांमध्ये कोण बाजी मारणार, याकडे बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागले आहे.
स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी (रत्नागिरी) आणि आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर (सांगली) काम पाहत आहेत. त्यांना राष्ट्रीय पंच करण परीट (इचलकरंजी), विजयकुमार माने (सांगली), अपर्णा शिंदे (सातारा), यश लोहाना (कराड), रोहित पोळ (इचलकरंजी) तसेच राज्य पंच नाझिया पटेल (मिरज) आणि अनिता भोसले (जांभळी) यांचे सहकार्य लाभत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या