कोल्हापूर प्रतिनिधी : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावावर प्रस्तावित एमआयडीसी लादण्याच्या विरोधात माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर व वारकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आमरण उपोषणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती देण्यात आली. या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा देत सलग तीन दिवस सक्रिय सहभाग नोंदविला.
सैनिक टाकळी ग्रामपंचायतीने यापूर्वीच "आमच्या गावात एमआयडीसी नको" असा ठराव करून संबंधित शासकीय विभागांकडे पाठविला होता. तसेच गावातील सुमारे ४७ हेक्टर गायरान जमिनीवर एमआयडीसी न करता सैनिक व नागरिकांच्या हितासाठी सैनिक शाळा, केंद्रीय विद्यालय, जिल्हा सैनिक क्रीडा संकुल, कमांडो हॉस्पिटल, माजी सैनिक हाऊसिंग सोसायटी, गावासाठी मल्टीपर्पज हॉल आणि कृषी विद्यालय उभारण्यात यावे, अशी गावातील माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर, वारकरी व कामगारांची मागणी आहे.
मात्र, आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या मागण्यांकडे दुर्लक्ष करून संबंधित गायरान जमिनीवर एमआयडीसी उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
या मागणीसाठी आंदोलन अंकुशचे दीपक पाटील, विनोद पाटील, रिटायर्ड वॉरंट ऑफिसर अमरसिंह पाटील, अमर पाटील, माजी सैनिक विजय गायकवाड आणि ऑनररी कॅप्टन प्रकाश खोत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
या आंदोलनादरम्यान "MIDC हटवा, सैनिक टाकळी वाचवा", "जय जवान, जय किसान", "तुमचं आमचं नातं काय... जय जिजाऊ, जय शिवराय", "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची" अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने सुरुवातीपासूनच जाहीर पाठिंबा दिला. जिल्हाध्यक्ष भगवान कोइंगडे, नेते डॉ. विकास पाटील, दत्तात्रय दीक्षित, दत्तात्रय मेटील आणि विक्रम खराडे, विद्यानंद पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते डॉ. विकास पाटील म्हणाले, "सैनिक टाकळी हे सैनिकांचे, देशसेवकांचे गाव आहे.1500 आजी माजी सैनिक आहेत. 18 जवान देशासाठी शहीद झालेत. ग्रामपंचायतीने एमआयडीसीविरोधात ठराव करूनही स्थानिक जनभावनांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. गावाच्या विकासासाठी सैनिक शाळा, कमांडो हॉस्पिटल, सैनिक क्रीडा संकुल यांसारखे प्रकल्प उभारणे हीच खरी राष्ट्रसेवा ठरेल. शासनाने प्रस्तावित एमआयडीसी तात्काळ रद्द करून ग्रामस्थांच्या मागणीनुसार निर्णय घ्यावा, " असेही डॉ. विकास पाटील म्हणाले.
दि. २९ जुलै २०२६ रोजी माजी खासदार राजू शेट्टी, उपोषणकर्ते आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील भावना कळविण्याचे लेखी आश्वासन दिले.
- मौजे सैनिक टाकळी येथील गट क्रमांक १९४ व १३५० मधील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प रद्द करावा
- एमआयडीसी मंजुरीसाठी वापरण्यात आलेल्या ग्रामसभा ठरावाच्या वैधतेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
- संबंधित विषयावर वरिष्ठ स्तरावरील बैठक आयोजित करून सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करत तोडगा काढणेत यावा.
या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र, 8 ऑगस्टपर्यंत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास 9 ऑगस्टला आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जयसिंगपूर कार्यालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलनकर्ते व संभाजी ब्रिगेडने दिला.
या आंदोलनस्थळी संभाजी ब्रिगेडचे सर्व जिल्हा पदाधिकारी, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार संपतराव पवार पाटील (बापू), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विवेकानंद गोडसे, अखिल भारतीय किसान सभेचे अमोल नाईक, ब्लॅक पॅंथरचे सुभाष देसाई,
शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे विजय देवणे, आजी-माजी सैनिक फेडरेशन, स्वराज्य क्रांती संघटनेचे आदम मुजावर व आंबेडकरी पक्षाचे दिगंबर सकट, लिंगायत धर्म महासभेच्या सरलाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, सैनिक टाकळी वारकरी संप्रदाय, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या