जत प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचे ‘देवभूमी जत’ असे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला विरोध करत तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जत तालुक्याच्या त्रिभाजनाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी जत तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी आमदार विक्रम सावंत, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक व पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतचे नाव ‘देवभूमी जत’ करण्यासाठी मांडलेल्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. जतचे नाव बदलण्यापेक्षा तालुक्याचे त्रिभाजन करून प्रशासन नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवावे, अशी भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली आहे.
क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात
९ ऑगस्ट रोजी सकाळी साधारण १० ते ११ वाजण्याच्या सुमारास जत शहरातील क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. मुख्य बाजारपेठ व शहरातील प्रमुख रस्त्यांवरून पदयात्रा करत हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचेल. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांची जाहीर सभा होणार असून, तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्व गावांमधून नागरिकांनी मोठ्या संख्येने जत शहरात उपस्थित राहावे, असे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आले आहे.
नामांतर नको, त्रिभाजन हवे
जत हा सांगली जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा तालुका असून तालुक्यात सुमारे १२५ गावे आणि २७६ हून अधिक वाड्या-वस्त्या आहेत. जत शहरापासून पूर्व भागातील सुसलाद, उमदी, हळ्ळी यांसारखी गावे ७० ते ८० किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे शासकीय कामांसाठी नागरिकांना मोठा प्रवास करून जत शहरात यावे लागते.
या पार्श्वभूमीवर जत तालुक्याचे जत, संख आणि उमदी असे तीन स्वतंत्र तालुके करावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. तालुक्याचे त्रिभाजन झाल्यास नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील तसेच प्रशासन अधिक गतिमान होईल, असा दावा आंदोलकांनी केला आहे.
संखला अपर तहसील, मात्र प्रश्न कायम
नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने २०१८ मध्ये संख येथे अपर तहसील कार्यालय सुरू केले. त्यासाठी उमदी परिसरातील नागरिकांनी यापूर्वी मोठा पायी मोर्चाही काढला होता. मात्र, संखला अद्याप स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे महसूल व अन्य प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना अनेकदा जत शहराची वारी करावी लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
जतच्या त्रिभाजनाची मागणी अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित असून, इतर ठिकाणी नवीन तालुके निर्माण झाले असताना जतच्या मागणीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ऐतिहासिक वारसा बदलण्याची भीती
‘देवभूमी जत’ या नामांतरामुळे जतचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा बदलण्याचा प्रयत्न होईल, अशी भीती व्यक्त करत सर्वपक्षीय नेत्यांनी नामांतराचा प्रस्ताव हाणून पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नाव बदलण्यापेक्षा जतच्या विकासाला प्राधान्य द्यावे, पूर्व भागातील नागरिकांची प्रशासकीय गैरसोय दूर करावी आणि त्रिभाजनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, पायाभूत सुविधा, रोजगार, शेती व दुष्काळासह स्थानिक प्रश्न सोडविणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे.
‘जत वाचवा, जत वाढवा’च्या भूमिकेतून आंदोलन
नामांतराचा निर्णय घेण्यापूर्वी जतच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यावे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या त्रिभाजनाच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन पूर्व भागातील नागरिकांना स्वतंत्र प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
९ ऑगस्टच्या क्रांतिदिनी होणाऱ्या या मोर्चातून जतच्या नामांतराविरोधात आणि त्रिभाजनाच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय एकजूट दाखविण्याचा निर्धार करण्यात आला असून, मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या