संग्रामपुर प्रतिनिधी : धार्मिक उत्सवांना सामाजिक बांधिलकीची जोड देण्यासाठी सोनाळा पोलीस स्टेशनचेठाणेदार संदीप काळे यांच्या संकल्पनेला टुणकीवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याच अनुषंगाने शिवभक्त कावड मंडळाच्या वतीने टुणकी बसस्थानक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
सईबाई मोटे शासकीय रुग्णालय, शेगाव येथील रक्तपेढीच्या पथकाच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात कावड मंडळाचे सदस्य युवक व ग्रामस्थ अशा मिळुन ५० जणांनी रक्तदान केले. शिबिराची सुरुवात काळे यांनी स्वतः रक्तदान करून केली. त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी संदीप पवार व परमेश्वर तितरे यांनीही रक्तदान केले.
यावेळी बोलताना ठाणेदार काळे म्हणाले रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धार्मिक व सामाजिक उत्सवांना समाजोपयोगी कार्याची जोड मिळाली पाहिजे. धार्मिक मिरवणुकीपूर्वी 5 झाडे लावणे, पुस्तक वाटप यांसारखे उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
दरम्यान, शिवभक्त कावड मंडळाने पुढील आठवड्यात गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा संकल्पव्यक्त केला. मंडळाचे अध्यक्ष सागर लोणकर, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या