सांगली प्रतिनिधी : "शिस्त आणि वेळेचे बंधन हा प्रत्येकाच्या जीवनामधील अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. मी स्वतः प्रत्येक कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहतो; ही शिस्त मला सैनिक शाळेतील संस्कारातून आत्मसात झाली आहे," असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र डिफेन्स अकॅडमीच्या पहिल्याच वर्षी एनडीए (NDA) प्रवेशासाठी आवश्यक असलेली अत्यंत कठीण SSB (Service Selection Board) मुलाखत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीरदादा गाडगीळ बोलत होते.
या कार्यक्रमात अकॅडमीतील कु. महेंद्र देवधर आणि कु. संस्कृती देशपांडे यांनी NDA ची SSB मुलाखत यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, कु. संस्कृती देशपांडे ही स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचीच विद्यार्थिनी आहे.
अकॅडमीचे संचालक निवृत्त कर्नल हेमंत जोशी यांनी अकॅडमीतर्फे NDA, CDS, इतर स्पर्धा परीक्षा आणि SSB मुलाखतीची तयारी कशी करून घेतली जाते, याची सविस्तर माहिती दिली. तसेच, शालेय विद्यार्थ्यांसाठी 'फाउंडेशन कोर्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट' सुरू करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रमुख उपस्थिती व सूत्रसंचालन
अध्यक्ष स्थान: श्री. विजय नामजोशी स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर सूत्रसंचालन श्री. संदीप वरठा आभार प्रदर्शन कार्यवाह श्री. सुनील देशपांडे यांनी केले या प्रसंगी अकॅडमीचे शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या