गगनबावडा : गगनबावडा परिसरात गव्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या हिंदुराव बळवंत कोटकर यांच्या साखरी येथील निवासस्थानी आमदार चंद्रदीप नरके यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी कोटकर कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आमदारांच्या विशेष पुढाकाराने शासनाकडून एकूण २५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
कोटकर यांच्यावर उपचार सुरू असताना सुरुवातीला दवाखान्याच्या खर्चासाठी ३ लाख रुपयांची मदत देण्यात आली होती. त्यानंतर काल रात्री आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते कुटुंबीयांकडे ७ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. उर्वरित १५ लाख रुपयांची मदतही लवकरच थेट कुटुंबीयांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'माणसाच्या जिवाची भरपाई पैशाने शक्य नाही, पण कुटुंबाला आधार देणे कर्तव्य'
यावेळी बोलताना आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, "कर्त्या पुरुषाचे अचानक जाणे हे कुटुंबावर कोसळलेले मोठे संकट असते. माणसाच्या जिवाची भरपाई कोणत्याही पैशाने होऊ शकत नाही, मात्र अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक आधार मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे."
विधानसभेत पुन्हा आवाज उठवणार: आमदार नरके
मानव आणि वन्यजीव यांच्यातील वाढत्या संघर्षावर चिंता व्यक्त करताना आमदार नरके यांनी सांगितले की, "वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीविताला निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत मी यापूर्वीही विधानसभेत वेळोवेळी आवाज उठवला आहे. मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी शासनाने केवळ तात्पुरती मदत न देता प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना आखणे अत्यंत गरजेचे आहे. या गंभीर प्रश्नावर आगामी काळातही विधानसभेत पाठपुरावा सुरूच राहील."
सांत्वनपर भेटीदरम्यान आमदार नरके यांनी उपस्थितांशी चर्चा करून स्थानिक ग्रामस्थांना वन्यप्राण्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी प्रशासन पातळीवर आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
यावेळी एकनाथ महादेव शिंदे, इंद्रजीत मेंगाने, प्रदीप पाटील, भारत पाटील, विठ्ठल पाटील, संजय पाटील, सहदेव पाटील, शांतिनाथ शेटे, एकनाथ खाडे, जयसिंग जाधव, दगडू कोटकर, किरण कांबळे, सुरेश खांदारे, धनाजी कोटकर, रणजीत मेंगाने, दत्तात्रय पाटील, शहाजी देसाई, विजय भोसले, शिवाजी चौगुले, संग्राम सुतार यांच्यासह साखरी गावातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या