प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:अल्पवयीन मतिमंद मुलीला फूस लावून तिच्यावर अत्याचार करून गर्भवती केल्याच्या गंभीर प्रकरणाचा तासगाव पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावत आरोपीला गुजरातमधून जेरबंद केले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी राजस्थान सीमेलगतच्या गुजरातमधील फतेपुरा येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. प्रदीप जगदीश सिंह (वय २५, रा. अमरसिंह का पुरवा, जगनपूर, जि. कानपूर देहात, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तासगाव शहरातील एका अल्पवयीन मतिमंद मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून मोटारसायकलवरून गोटेवाडी रोडलगतच्या कॅनॉल परिसरातील तलावाजवळील टेकडीवरील झाडाझुडपात नेले. तेथे तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या आईने तासगाव पोलिसांत दाखल केली होती.या अत्याचारामुळे मुलगी गर्भवती झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायदा २०१२ आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.पीडित मुलगी मतिमंद असल्याने आरोपीबाबत ठोस माहिती मिळवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी उपलब्ध तांत्रिक माहिती,कौशल्यपूर्ण तपास आणि विविध बाबींचा बारकाईने मागोवा घेत आरोपीची ओळख पटवली. तपासादरम्यान प्रदीप सिंह हा वेगवेगळ्या राज्यांत फिरून बादल्या तसेच गॅस शेगडी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.आरोपी सध्या गुजरातमधील राजस्थान सीमेलगतच्या फतेपुरा येथे असल्याची माहिती मिळताच तासगाव पोलिसांचे पथक गुजरातला रवाना झाले.तेथे सापळा रचून पोलिसांनी प्रदीप सिंह याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला तासगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतर चौकशी करण्यात आली.चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपीला परराज्यातून अटक करण्यात तासगाव पोलिसांना यश आले आहे.अल्पवयीन व असहाय पीडितेवरील अत्याचाराच्या प्रकरणात तांत्रिक तपासाच्या जोरावर आरोपीपर्यंत पोहोचत पोलिसांनी दाखवलेली तत्परता चर्चेचा विषय ठरली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी,अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि तासगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर सूर्यवंशी, पोलीस शिपाई सुरज जगदाळे व निलेश डोंगरे यांचा समावेश होता.पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका माने करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या