इयत्ता ९ वीच्या NCERT सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात करण्यात आलेल्या बदलांविरोधात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, सांगलीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत NCERT, नवी दिल्ली यांना निवेदन सादर करण्यात आले.
नवीन सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता (Secularism) आणि समाजवाद (Socialism) या मूलभूत मूल्यांचा स्पष्ट उल्लेख कमी झाल्याची बाब चिंताजनक असल्याचे आंदोलनाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच संविधानाच्या प्रस्तावनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात समजावून सांगितले जात नसल्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली.
मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्यात आल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणातील संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शाळांमध्ये विविध जाती, धर्म, भाषा आणि सामाजिक स्तरांतील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने सर्वधर्म समभाव, समानता, बंधुता, परस्पर आदर, संविधानिक मूल्ये आणि नागरिक हक्क-कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे हे शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख कर्तव्य असल्याचे आंदोलनाने स्पष्ट केले.
कोणत्याही एका धर्माचे किंवा विचारसरणीचे वर्चस्व शिक्षण व्यवस्थेत जाणवू नये, अशी भूमिका मांडत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने NCERT कडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये इयत्ता ९ वीच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात धर्मनिरपेक्षता व समाजवाद या संविधानिक मूल्यांचा स्पष्ट समावेश करणे, संविधानाच्या प्रस्तावनेचे महत्त्व सविस्तर शिकविणे, सामाजिक समता व वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारा अभ्यासक्रम विकसित करणे, तसेच कोणत्याही धार्मिक किंवा वादग्रस्त ग्रंथातील मजकूर समाविष्ट करताना संविधानिक मूल्यांना बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेणे यांचा समावेश आहे. याशिवाय, सदर बदलांबाबत NCERT ने अधिकृत स्पष्टीकरण जाहीर करावे, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, सांगली जिल्हा निरीक्षक ऋषिकेश माने, अशोक लोंढे, सतीश शिकलगार, गुरुदत्त चंदनशिवे, विशाल कोठावळे, हर्ष लोंढे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी आणि वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या