सांगली, प्रतिनिधी : श्री गुजराती सेवा समाज, सांगली संचालित श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, सांगली येथे इयत्ता ११ वी प्रवेशित विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ, विद्यार्थिनी,पालक-शिक्षक स्नेहमेळावा तसेच इयत्ता १२ वीत गुनानुक्रमे प्रथम तीन आलेल्या गुणवंत विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.या मेळाव्यास संस्थेचे अध्यक्ष कांतीभाई वामजा, सचिव रमणिकभाई दावडा आणि सदस्य रितेशभाई शेठ यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बारावी परीक्षेत गुणवत्ता यादीत अग्रक्रम प्राप्त केलेल्या उजमा पठाण, रोशनी सहानी, सिया महाजन, मेघा कुलाळ, समीक्षा कांबळे आणि पायल भाकरे या विद्यार्थिनींचा त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींच्या वतीने उजमा पठाण हिने मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाने केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी दिलेले योगदान कृतज्ञतापूर्वक अधोरेखित केले.
पालकांच्या वतीने अरविंद काटकर आणि निशिकांत चरणकर यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन, सुरक्षित, शिस्तबद्ध वातावरण आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण जडणघडणीत संस्थेने बजावलेली भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे सांगून महाविद्यालयाविषयी दृढ विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी नुकत्याच महाराष्ट्र पोलीस दलात नियुक्त झालेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व कुस्तीपटू पल्लवी बागडी, सानिका केरीपाळे, स्वप्नाली बसण्णावर आणि प्रतीक्षा चरणकर यांचा त्यांच्या पालकांसह विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाने उपस्थित विद्यार्थिनींना प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर म्हणाले की, "महाविद्यालयात पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शिक्षण, रोजगाराभिमुख अल्पकालीन प्रशिक्षण तसेच व्यक्तिमत्त्व विकासावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावर विशेष भर दिला जात आहे. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि संस्कार जोपासत शहरी व ग्रामीण सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षणाच्या सक्षम संधी उपलब्ध करून देणे हेच महाविद्यालयाचे ध्येय आहे."
संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थिनींच्या यशाचा गौरव तर झालाच, शिवाय महाविद्यालयाविषयी पालकांचा दृढ विश्वास आणि शिक्षणातील गुणवत्तेची परंपराही अधोरेखित झाली. त्यामुळे हा मेळावा प्रेरणादायी, उत्साहवर्धक आणि संस्मरणीय ठरला असल्याचे पालक प्रतिनिधी रुकसाना मुजावर यांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. सौ.एस. एम. जाधव यांनी स्वागत केले. गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. प्रा. डी. डी. राऊत यांनी विद्यार्थिनींच्या यशाचा आढावा आणि प्राध्यापकांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. वर्षा सुखदेव आणि प्रा. प्रमिला तावडे यांनी केले. आभार प्रा. श्रुती जोशी यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या