ईश्वरपूर (सांगली) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (मअंनिस), शाखा-इस्लामपूर आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, ईश्वरपूर यांच्या वतीने 'अंनिस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार दि. ११ जुलै आणि रविवार दि. १२ जुलै २०२६ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, ईश्वरपूर (जि. सांगली) येथे संपन्न होणार आहे.
या दोन दिवसीय शिबिराचे उद्घाटन शनिवार, ११ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता अंनिस च्या मार्गदर्शिका आणि महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी मा. सरोज पाटील (माई) यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षपद व्ही. वाय. आबा पाटील भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे ह. भ. प. देवदत्त परुळेकर असणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी.व्ही. गायकवाड व इतर मान्यवर प्रमुख उपस्थित असतील. या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे ह. भ. प. देवदत्त परुळेकर यांनी लिहिलेल्या ‘वारकरी महिला संत आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावरील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा दहा पुस्तकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
दोन दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने चला अंनिस समजून घेऊया: फारूख गवंडी, अर्थ निरक्षरता आणि अर्थ अंधश्रद्धा: डॉ. विजय ककडे, चमत्कार सादरीकरण व बुवाबाजी संघर्ष: दिपक कोठावळे, मन आणि मनाचे आजार: डॉ. घनश्याम कांबळे, वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद: सुजाता म्हेत्रे, कार्यकर्त्यांचे मानसिक आरोग्य: डॉ. हमीद दाभोलकर,जादूटोणा विरोधी कायदा: राहुल थोरात आणि फलजोतिषचा फोलपणा: वाघेश साळुंखे या विषयावर वरील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. संजय निटवे यांच्या मार्गदर्शनात शनिवारी रात्री आकाश निरीक्षण कार्यक्रम होणार आहे.
रविवार, १२ जुलै रोजी दुपारी या शिबिराचा सांगता व समारोप समारंभ होणार आहे. या समारोप सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून इस्लामपूरचे नगराध्यक्ष मा. आनंदराव मलगुंडे, आणि कॉ.धनाजी गुरव उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ईश्वरपूर शाखेचे कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी व नाव नोंदणीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन मअंनिस परिवारातर्फे करण्यात आले आहे:
• डॉ. एस. के. माने (राज्य कार्यवाह, मअंनिस) – ९४२२४ २५८१०
• अमर खोत (जिल्हा कार्याध्यक्ष, मअंनिस) – ९७६५१ ११६०९
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या