सांगली प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धन, आरोग्य, संस्कृती, सामाजिक जाणीव आणि युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची प्रेरणा रुजविण्याचे कार्य गेली दहा वर्षे सातत्याने करणाऱ्या निसर्गरंग फाउंडेशन, सांगलीच्या वतीने दहाव्या वर्षानिमित्त "निसर्गराया भेटूया... चला विठ्ठल फिरूया..." या प्रेरणादायी संकल्पनेतून "सांस्कृतिक नगरी सांगली ते विठ्ठल नगरी पंढरपूर" अशी दहावी निसर्ग सायकलवारी आयोजित करण्यात आली आहे.
या सायकलवारीचा शुभारंभ मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता सांगलीतील आमराई परिसरातील हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे स्मारकास अभिवादन करून होणार आहे. या प्रसंगी मा. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष (IAS), जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. गि. ग. कांबळे आणि सुप्रसिद्ध उद्योगपती मा. शेखर बजाज यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकलवारीला सुरुवात होईल.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अवघ्या १७–१८ व्या वर्षी सर्वोच्च बलिदान देणारे हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे यांना अभिवादन करून सुरू होणारी ही सायकलवारी नव्या पिढीला देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारी ठरणार आहे.
ही सायकलवारी सांगली – कवलापूर – कुमठे – मणेराजुरी – वडगाव – सावळज – वायफळे – भिवघाट – आटपाडी – दिघंची या मार्गाने प्रवास करत आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या चरणी पोहोचणार आहे.
हा प्रवास केवळ सायकलचा नाही, तर मूल्यांचा, संस्कारांचा आणि समाजप्रबोधनाचा प्रवास आहे. या उपक्रमातून वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, प्रबोधन, शारीरिक तंदुरुस्ती, वाहतूक शिस्त, राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची प्रेरणा, सामाजिक बांधिलकी, वारकरी संस्कृतीचा परिचय, संघभावना स्वावलंबन वाढीस लागेल.
दहा वर्षांच्या सामाजिक प्रवासात निसर्गरंग फाउंडेशनने पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात अनेक विधायक उपक्रम राबवून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. दहाव्या वर्षातील ही सायकलवारी त्या सेवाव्रताचा नवा टप्पा असून युवकांना निरोगी, संवेदनशील, पर्यावरण जाणीव जागृती आणि राष्ट्राभिमानी जीवनाची दिशा देणारी ठरणार आहे.
या उपक्रमात साहित्य, कला, पर्यावरणप्रेमी, युवक, वारकरी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या जनजागृती अभियानाला बळ द्यावे, असे आवाहन निसर्गरंग फाउंडेशनचे संस्थापक कुलदीप देवकुळे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या