कोल्हापूर, प्रतिनिधी – नीट परीक्षा पेपर लिकेज प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसद भवनावर काढलेल्या मोर्चादरम्यान झालेल्या अमानुष लाठीचार्जाचा कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध व्यक्त केला.
कॉकरोज जनता पार्टीच्या वतीने देशाचे लोकप्रिय सायंटिस्ट सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाला पोलिसांच्या वेशातील गुंडांनी मोडीत काढल्याचा आरोप करत रिपब्लिकन पक्षाने सरकारच्या हुकूमशाही वृत्तीवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगत धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा देशाचा उज्ज्वल इतिहास असून, त्याला हिटलरशाही पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न हा लोकशाहीचा अपमान असल्याचे रिपब्लिकन पक्षाने स्पष्ट केले. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून तोडगा काढण्याऐवजी सरकारने अहंकाराने उपोषण मोडीत काढल्याचा आरोप करण्यात आला.
या निषेधासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजयकुमार राठोड यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पक्षाचे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष आयु. दत्ता मिसाळ, जिल्हा सचिव आयु. सतीश माळगे, उपाध्यक्ष संजय जिरगे, इचलकरंजी शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. कृष्णात सडोलीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
👉 या घडामोडींमुळे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या भावनांचा उद्रेक आणि सरकारच्या लोकशाहीवरील दृष्टिकोन यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या