सांगली प्रतिनिधी : वीर शिवा काशीद यांच्या ३६६ व्या पुण्यतिथीनिमित्त संत सेनामहाराज मंदिर, गावभाग, सांगली येथे हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीर शिवा काशीद यांच्या शौर्य, त्याग आणि स्वामिनिष्ठेला अभिवादन केले.
यावेळी बोलताना नितीन शिंदे म्हणाले, इ.स. १६६० मध्ये आदिलशाहीचा सरदार सिद्दी जौहर याने पन्हाळगडाला वेढा घातला असताना छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी वीर शिवा काशीद यांनी स्वतः महाराजांचा वेष धारण करून पालखीत बसण्याचा निर्णय घेतला. आपल्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी शत्रूची दिशाभूल केली. त्यांच्या या अतुलनीय बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना वेढ्यातून सुटका करून विशाळगड गाठणे शक्य झाले. अखेर वीर शिवा काशीद यांनी स्वराज्यासाठी वीरमरण पत्करले. त्यांच्या त्याग, शौर्य आणि स्वामिनिष्ठेचा आदर्श आजच्या युवकांनी डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि देशरक्षणासाठी कार्य केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष पै. प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, भूषण गुरव, दाजी काळे, गजानन माने, अरुण साळुंखे, विक्रम गंगधर, संतोष खंडागळे, रवींद्र जाधव, रावसाहेब बन्ने, जोतिराम चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या