प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा कमी होत असल्याने तासगाव शहरात आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा तासगाव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार,शहरातील काही नळ कनेक्शनधारकांनी अद्यापही त्यांच्या नळांवर चावी अथवा तोटी बसविलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून त्याचा संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे.ही परिस्थिती कायम राहिल्यास नगरपरिषदेला पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो.यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप नळांना चावी किंवा तोटी बसविलेली नाही, त्यांनी तत्काळ स्वतःच्या खर्चाने ती बसवून घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित नळ कनेक्शनधारकांविरुद्ध लागू नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून कोणतीही पूर्वसूचना न देता नळ कनेक्शन बंद करण्यात येईल,असा कडक इशाराही देण्यात आला आहे.
पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा सभापती रोहिणी धोत्रे,मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे आणि नगराध्यक्षा सौ.विजया पाटील यांनी केले आहे
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या