प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. १६ : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नियमित लसीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, लसीकरणाचे बळकटीकरण तसेच लसीकरण मोहिमांमधील अडचणी व उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी महापालिका सिटी टास्क फोर्स समितीची बैठक आज महानगरपालिका आयुक्त तथा समिती अध्यक्ष संजिता महापात्र यांच्या अनुमतीने उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी मुलींना गर्भाशयमुख कर्करोगापासून बचाव करण्यासाठी शासनातर्फे सुरू असलेल्या एच पी व्ही लसीकरण मोहिमेचा आढावा घेऊन यासंदर्भात पालकां अधिकाधिक प्रबोधन करावे, असे सूचित करण्यात आले.एचपीव्ही लस ही एक सुरक्षित लस आहे, जी कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या एचपीव्ही विषाणूपासून संरक्षण करते. ही प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे शाळांमध्ये तसेच पालकांमध्ये याबाबत विविध स्तरावरून प्रबोधन करावे, असे यावेळी सूचित करण्यात आले.
याचबरोबर बैठकीत शहरातील 10 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत करण्यात येणाऱ्या ० ते १६ वर्षे वयोगटातील बालकांच्या नियमित लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. लसीकरणामुळे टाळता येणाऱ्या आजारांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व कमी करण्यासाठी शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यावर भर देण्यात आला. तसेच लसीकरण मोहिमांची प्रभावी अंमलबजावणी, वंचित भागातील लाभार्थींपर्यंत पोहोचणे, लसीकरणाबाबत जनजागृती वाढविणे आणि लसीकरणाबाबत निर्माण होणारे गैरसमज दूर करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी गर्भवती माता ट्रॅकिंग, प्रशिक्षण, शीतसाखळी व्यवस्थापन, लसीकरण साहित्याची उपलब्धता, लसीकरण सेवेची गुणवत्ता वाढविणे आणि विभागीय समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याबाबत नियमित आढावा घेऊन लसीकरणाची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीस महापालिका वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील आणि डॉ. सुचेता पवार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, महिला व बाल विकास विभागाचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.
महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक पात्र बालक आणि गर्भवती महिलांपर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. ज्या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशी ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी मोहीम स्वरूपात हे काम पूर्ण करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या