प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : तासगाव तालुक्यात युवकांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या अवैध इंजेक्शन विक्री रॅकेटवर तासगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. बलगवडे परिसरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ३७ हजार रुपये किमतीचा मेफेन्टर्मिन सल्फेट इंजेक्शनचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, नशेच्या वाढत्या विळख्यावर पोलिसांनी थेट प्रहार केल्याची चर्चा सुरू आहे.तासगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, बलगवडे ते मांजर्डे रोडलगत असलेल्या बलगवडे वस्ती परिसरात काही जण नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची अवैधरित्या विक्री करत आहेत. त्यानुसार दि. २० मे २०२६ रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी नागेश अरविंद औताडे यांच्या पत्रा व लोखंडी जाळीच्या शेडवर अचानक छापा टाकला.या कारवाईत पोलिसांना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. झडती घेतली असता मेफेन्टर्मिन सल्फेट इंजेक्शन या नावाच्या इंजेक्शनचे तब्बल ८५ बॉक्स/बॉटल असा मोठा साठा मिळून आला.प्रत्येक इंजेक्शन बॉटलची किंमत सुमारे ४३५ रुपये असून, एकूण जप्त साठ्याची किंमत ३७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी विठ्ठल श्रीकांत सानप (वय ३४, रा. बेडग, सध्या तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागेश अरविंद औताडे (वय २१, रा. बलगवडे वस्ती) व समीर अमजद मुलाणी (वय २४, रा. बलगवडे स्टँडजवळ) या दोघांनी संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी लोकांना नशा करण्याच्या उद्देशाने हा अवैध साठा जवळ बाळगल्याचा आरोप करण्यात आला आहे.पोलिसांनी दोघांनाही घटनास्थळी ताब्यात घेतले असून,रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईनंतर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.प्राथमिक तपासात हा साठा परिसरात विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती समोर येत असून,या रॅकेटमागे आणखी कोणी आहे का,याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.ही धडक कारवाई पोलीस अभिजित गायकवाड,विनोद पाटील,पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, पोलीस शिपाई विठ्ठल सानप,संतोष माळी यांच्या पथकाने केली.तासगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे नशेच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या