प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यादरम्यान शेतकऱ्यांची व्यापारी आणि अडत्यांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमोल काळे यांनी केला असून, या प्रकाराला आळा घातला नाही तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन बाजार समिती सचिव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली आणि जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आले आहे.मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तासगाव येथील बेदाणा सौद्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या मालाची सर्रास उधळण केली जात आहे. मालाची गुणवत्ता तपासण्याच्या नावाखाली प्रत्येक बॉक्समधून तब्बल दोन ते तीन किलो बेदाणा खाली टाकला जातो. हंगामात तीन ते चार हजार कलमांचा व्यवहार होत असल्याने, या प्रक्रियेतून वर्षाकाठी सुमारे एक हजार टन बेदाणा वाया जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, खाली टाकण्यात आलेला हाच बेदाणा नंतर व्यापाऱ्यांकडून पुन्हा गोळा केला जातो. त्यानंतर त्यावर पॉलिश करून तो पुन्हा बाजारात विक्रीस आणला जात असल्याचा दावा मनसेने केला आहे. या प्रकारातून व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा होत असताना, मेहनत, वेळ आणि लाखो रुपये खर्च करून दर्जेदार माल तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आर्थिक फटका बसत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.याशिवाय, बेदाणा विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना तातडीने न देता तब्बल ४० दिवसांनी दिले जातात. जर शेतकऱ्यांना तातडीने पैसे हवे असतील तर “वटावा”च्या नावाखाली दोन टक्के रक्कम कपात केली जाते. त्यावरही आरटीजीएस शुल्क आकारले जात असल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक भार टाकला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मनसेने या संदर्भात काही ठोस मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये बेदाण्याची उधळण तात्काळ बंद करणे, बॉक्समधील मालाची नासाडी रोखणे, तुटीबाबत स्पष्ट नियमावली लागू करणे आणि शेतकऱ्यांना त्वरित संपूर्ण पेमेंट देण्याची व्यवस्था करणे या मागण्यांचा समावेश आहे.बाजार समिती प्रशासन आणि पदाधिकारी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत अमोल काळे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. शेतकऱ्यांची सुरू असलेली पिळवणूक तातडीने थांबवली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि तासगावमधील बेदाणा सौदे बंद पाडण्याचा मार्ग स्वीकारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.बेदाणा व्यापारातून समृद्धीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या तासगाव बाजार समितीतच शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप झाल्याने परिसरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या