प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव शहराच्या मूलभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने तासगाव नगरपरिषदेत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहरातील पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम, अद्ययावत आणि कार्यक्षम करण्यासोबतच नगरपरिषदेसाठी स्वतंत्र सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीला माजी खासदार संजयकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.तासगाव नगरपरिषदेवर शहरातील पाणीपुरवठा योजना आणि सार्वजनिक वीज वितरणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या वीज बिलाचा आर्थिक ताण पडत आहे. हा वाढता खर्च कमी करण्यासाठी शहरासाठी लागणारी वीज सौर ऊर्जेतून निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा बैठकीत मांडण्यात आला. यासाठी सुमारे २.५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्राथमिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.या प्रकल्पामुळे नगरपरिषदेचा आर्थिक भार कमी होण्याबरोबरच पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीला चालना मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. याबाबत राज्य शासनाकडे तातडीने पाठपुरावा करून योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिले.बैठकीत तासगाव शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींवरही गंभीर चर्चा झाली. नागरिकांना नियमित, स्वच्छ आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे यासाठी जुन्या जलवाहिन्यांतील गळती रोखणे, वितरण व्यवस्था अधिक आधुनिक करणे आणि पुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात आला.शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प आणि सुधारित पाणीपुरवठा योजना टप्प्याटप्प्याने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही योजना पूर्ण झाल्यानंतर तासगाव शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.या बैठकीस मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे, तांत्रिक सल्लागार संजय पवार, रविंद्र माने, नगराध्यक्षा विजया पाटील, उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान, पक्षप्रतोद सतीश लिंबळे, नगरसेवक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या