प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडत असताना, या काळात कायद्याने प्रतिबंधित असलेल्या बालविवाहाच्या घटना घडू नयेत, यासाठी तासगाव तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. “तासगाव तालुक्यात एकही बालविवाह होऊ देणार नाही,” असा ठाम इशारा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अतुल पाटोळे यांनी दिला आहे.तहसीलदार कार्यालय आणि महिला व बालविकास विभागाचे तालुका संरक्षण अधिकारी महेश सावंत यांच्या संयुक्त समन्वयातून संपूर्ण तालुक्यात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, गावागावांत प्रशासनाचे लक्ष ठेवले जाणार आहे.बालविवाहास आळा घालण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात स्वतंत्र यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
कायद्यानुसार कठोर कारवाई----
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असताना विवाह लावून देणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. अशा विवाहासाठी जबाबदार असणारे आई-वडील, नातेवाईक, पुरोहित, मंगल कार्यालय चालक, वाजंत्री तसेच पत्रिका छपाई करणारे यांच्यावरही थेट कारवाई करण्यात येणार आहे.या गुन्ह्यात दोषी आढळल्यास २ वर्षांपर्यंत सक्त मजुरीची शिक्षा आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड अशी कठोर शिक्षा होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गावागावांत विशेष पथके तैनात---
अक्षय तृतीयेच्या दिवशी ग्रामीण भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांची विशेष पथके गावोगावी लक्ष ठेवून असणार आहेत.तर शहर भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.प्रशासनाने सर्व सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांना विवाहापूर्वी वर-वधूच्या वयाची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच तालुक्यातील सर्व मंगल कार्यालये आणि लॉन्स चालकांना त्यांच्या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक विवाहासाठी जन्मदाखला किंवा बोनाफाईडद्वारे वयाची पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नागरिकांनी पुढे यावे---
बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. परिसरात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
चाईल्ड हेल्पलाईन : १०९८
पोलीस मदत : ११२
माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सामाजिक अनिष्ट प्रथेवर आळा---
“बालविवाह ही केवळ कायद्याची नव्हे तर समाजाच्या भविष्यासाठी घातक ठरणारी अनिष्ट प्रथा आहे. मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षित भविष्य जपण्यासाठी समाजाने प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे,” असे संयुक्त आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे आणि तालुका संरक्षण अधिकारी महेश सावंत यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या