सांगली प्रतिनिधी : कवलापूर ता. मिरज येथे दि. १३,१४ आणि १५ मार्च रोजी होणार्या डॉ. पॉल दिनाकरण यांच्या जाहीर कार्यक्रमात या 'फादर'कडून प्रार्थनेने कोणतेही अपंगत्व प्रार्थनेने बरे करणे, गाठ बरी करणे यांसारखे असाध्य आजार बरे करण्याचा दावा करण्याची शक्यता आहे.
डॉ. पॉल दिनाकरण त्यांच्या युट्युब वरील पूर्वीच्या कार्यक्रमातील व्हिडिओमध्ये असे अनेक असाध्य आजार बरे करण्याचे दावे केले आहेत. याच व्यक्तीचा कवलापूर विमानतळ येथे जाहीर कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली असाध्य रोग बरे करण्याचा खोटा दावा करून भोळ्याभाबड्या जनतेची फसवणूक करण्याची शक्यता आहे. असे खोटे दावे करणे महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली पोलीस प्रशासनास विनंती करते की, त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग करावे आणि या कार्यक्रमांमध्ये जर डॉ. पॉल दिनाकरण यांनी प्रार्थनेने रोग बरे करण्याचे दावे केल्यास किंवा त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गीता ठाकर, डॉ.संजय निटवे जगदीश काबरे, राहुल थोरात, डॉ.सविता अक्कोळे, प्रा.अमित ठाकर, त्रिशला शहा, मालोजी माने, रोहित खोत यांनी आज दिले.
या कार्यक्रमांमध्ये प्रार्थनेने आजार बरे करण्याचा दावा जर पॉल दिवाकरत यांनी केला तर त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत गुन्हा कवलापूर हद्दीतील संबंधित पोलीस स्टेशन मधील 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्षा'तील दक्षता अधिकाऱ्यांनी दाखल करावा अशी मागणी अंनिसने या निवेदनात केली आहे.
प्रार्थनेने किंवा चमत्काराने रोग बरे करण्याचा दावा करणे हा 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम, २०१३' नुसार दखलपात्र गुन्हा आहे.अनुसूचीतील कलम ५ नुसार दैवी शक्तीचा संचार झाल्याचा बनाव करणे किंवा त्याद्वारे आजार बरा करतो असे भासवून लोकांना फसवणे, ठकवणे. तसेच अनुसूचीतील कलम ११ नुसार मंत्र-तंत्र, प्रार्थना किंवा तथाकथित चमत्काराने आजार बरा करण्याचा दावा करून व्यक्तीला वैद्यकीय उपचारांपासून रोखणे आणि त्यांच्या जीवाशी खेळणे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रार्थना सभेला विरोध नाही, पण प्रार्थनेने रोग बरे करण्याला विरोध आहे. प्रार्थनेने मानसिक समाधान मिळू शकते, पण आजार हे वैद्यकीय उपचारानेच बरे होऊ शकतात.वैद्यकीय उपचारांपासून रुग्णांना परावृत्त करून त्यांना केवळ प्रार्थनेच्या भरवशावर ठेवणे, हे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. यामुळे अनेक रुग्णांचा आजार बळावून त्यांचा मृत्यू ओढवू शकतो.
- राहुल थोरात, अंनिस कार्यकर्ते, सांगली
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या