प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील असळज मतदारसंघात जिल्हा परिषद उमेदवार संभाजीराव पाटणकर आणि पंचायत समितीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचाराने वेग घेतला असून, गावोगाव आणि वाड्या–वस्त्यांमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
संपूर्ण तालुक्यात वाड्या-वस्त्यांमध्ये विखुरलेला आणि तालुक्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या असळजमध्ये एकूण ७,५६१ मतदार असून त्यामध्ये ३,९४० पुरुष व ३,६२१ महिला मतदारांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या आणि निर्णायक मतदारसंघात प्रचार यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ व दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते रात्रीचा दिवस करत प्रचारात झोकून दिले आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील यांनी दिलेला सक्रिय आणि भक्कम पाठिंबा.
प्रकाश पाटील स्वतः मैदानात उतरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकसंघ ठेवत असून, आघाडीचा धर्म पाळत उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची यंत्रणा प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत पोहोचली असून, याचा थेट फायदा आघाडीच्या उमेदवारांना होताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सशक्त पाठिंब्यामुळे असळज मतदारसंघात संभाजी पाटणकर व राजेश पाटील यांचा विजय निश्चित मानला जात असून, तालुक्याच्या राजकारणात प्रकाश पाटील यांची भूमिका निर्णायक ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या