प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली –मिरज– कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १६ मधील स्वच्छता व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघडकीस आल्या असून नगरसेविका अॅड. स्वाती शिंदे यांनी याबाबत महापालिका आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर करत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
नागरिकांकडून सातत्याने अस्वच्छतेच्या तक्रारी येत असल्याने अॅड. स्वाती शिंदे यांनी सकाळी सहा वाजता स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरी ठिकाणी अचानक पाहणी केली. प्रभाग क्रमांक १६ मध्ये दोन हजेरी केंद्रे असून हिराबाग कॉर्नर येथे केवळ एकच कर्मचारी , तर चोपडे हॉस्पिटलच्या पिछाडीस असलेल्या केंद्रावर फक्त सात कर्मचारी साडेसहा वाजेपर्यंत हजर होते. प्रत्यक्षात या प्रभागात ५० हून अधिक स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. पाहणीवेळी स्वच्छता निरीक्षक अनुपस्थित असून दोन मुकादमांपैकी फक्त प्रवीण चव्हाण उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १६ हा शहरातील मध्यवर्ती प्रभाग असून येथे ४० हून अधिक गल्ल्या, मुख्य रस्ते, फुटपाथ, चौक, बाजारपेठा, मच्छी व मटन मार्केट, शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज, एमएसईबी कार्यालय, उद्याने अशा अनेक वर्दळीच्या ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे अॅड. शिंदे यांनी नमूद केले आहे.
या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्वच्छता कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची हजेरी व्यवस्थित होण्यासाठी बायोमेट्रिक फेस रीडिंग व मोबाईल ट्रॅकिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, अनुपस्थित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी, तसेच महापालिकेकडून दिलेल्या मास्क, हॅन्ड ग्लोज, जॅकेट, गमबूट आदी साधनांचा नियमित वापर बंधनकारक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नागरिकांशी वर्तणूक सुधारण्याची गरज असून याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. प्रभागाचे भागांमध्ये विभाजन करून प्रत्येक भागासाठी ठराविक कर्मचारी नेमावेत . संपूर्ण प्रभागाची स्वच्छता कचरा उठाव. गटार काढणे दूर फवारणी औषध फवारणी. धोकादायक फांद्या उतरवणे. तन नाशक मारणे आदी कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता विभागाची तातडीची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना व सफाई कामगारांना स्पष्ट सूचना द्याव्यात, सदरची परिस्थिती व स्वच्छता विभागाचा कारभार हा फक्त या प्रभागातच नसून सर्वच प्रभागांमध्ये आहे. अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
प्रभागाच्या स्वच्छतेबाबत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम इशारा नगरसेविका अॅड. स्वाती शिंदे यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या