प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : येथील दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, सांगली संचलित एमटीडीके शैक्षणिक संकुलात तीन दिवसीय स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी सेमी इंग्लिश स्कूल, मालगाव यांच्या वतीने ‘कलादर्शनम्’ या संकल्पनेवर आधारित नेत्रदीपक नृत्यदिग्दर्शन सादर करण्यात आले.
या सादरीकरणातून भारतीय संस्कृतीतील विविधतेतून एकता हा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. विशेषतः ‘छावा’ ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संकल्पना उपस्थित पालकांच्या मनाला स्पर्शून गेली. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली महाराष्ट्राचे कुलदैवत विठ्ठल गाथा, शिवछत्रपती महाराजांच्या मावळ्यांचे शौर्य आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता सकारात्मक मार्ग स्वीकारावा, सरकार व अखंड महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे, हा आशावादी संदेश देणारी संकल्पना विशेष चर्चेचा विषय ठरली.
लहान मुलांनी स्वामी समर्थ महाराज यांच्यावर आधारित सादरीकरणातून संपूर्ण वातावरण स्वामीमय केले. एकंदरच हे स्नेहसंमेलन मिरजकरांसाठी केवळ करमणूक न राहता, बालमनांवर संस्कार करणारे व पालकांमध्ये प्रबोधन घडविणारे प्रभावी माध्यम ठरले, असे गौरवोद्गार डॉ. आ. सुरेश भाऊ खाडे यांनी काढले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, डेल्टा कंपनीच्या संचालिका वृषाली आडमुठे, जागतिक कीर्तीचे आर्किटेक्चर मॉडेल मेकर रमेश बलुरगी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, रसिकाताई खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील व करुणा माने यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या