प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 20 : एचआयव्हीची लागण झालेल्या आणि नियमित ए.आर.टी. उपचार घेत असलेल्या विवाह इच्छुक व्यक्तींना योग्य जीवनसाथी मिळावा, त्यांना सन्मानाने आणि सुरक्षिततेने आयुष्य जगता यावे या उद्देशाने एच.आय.व्ही. संसर्गित व्यक्तींसाठी 1 मार्च 2026 रोजी सांगली येथील मराठा सेवा संघ हॉलमध्ये वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विवाह इच्छुक युवक-युवतींनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये एचआयव्हीविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. डिसेंबर 2026 पर्यंत जिल्ह्यात एकही नवीन एचआयव्ही संसर्गित रुग्ण आढळू नये, हे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. यासाठी एचआयव्हीचा संसर्ग कशामुळे होतो, तो कसा टाळता येतो, तसेच सुरक्षित जीवनशैली कशी अवलंबावी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन व नियंत्रण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सांगली, ए.आर.टी. सेंटर सांगली व मिरज, उपजिल्हा रुग्णालय ईश्वरपूर, भारती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सांगली, तसेच सर्व आय.सी.टी.सी. व लिंक ए.आर.टी. सेंटर आणि सर्व स्वयंसेवी तसेच विहाण संस्था सांगली व मिरज नियोजन करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या