प्रतिष्ठा न्यूज
सांगली : येथील श्रीमती प्रमिलादेवी गुलाबराव पाटील (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. माजी खासदार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, सहकारमहर्षी दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या त्या पत्नी तर भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांच्या आई होत. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) सकाळी आहे.
करवीर संस्थानातील तत्कालीन चीफ ऑफ पोलीस बाबासाहेब निंबाळकर यांच्या त्या कन्या. शाहू महाराजांच्या दरबारात त्यांचे आजोबा पहिल्या वर्गाचे सरदार होते. १९४९ मध्ये त्यांचा गुलाबराव पाटील यांच्याशी विवाह झाला. वकिली, राजकारण, सहकार, समाजकारण यात गुलाबराव पाटील व्यस्त असायचे. कुटुंबाची संपूर्ण धुरा प्रमिलादेवींनी वाहिली. स्व. शिवराज व पृथ्वीराज ही दोन मुले तर पूजा व उज्ज्वला या कन्या. छात्र जगद्गुरू बेनाडीकर-पाटील घराण्यातील सून असल्याने त्या पद्धतीचे संस्कार त्यांनी मुलांवर केले. त्या पाककलेत प्रवीण होत्या. प्रतिष्ठित, श्रीमंत कुटुंबातील असूनही त्यांनी साधेपणा जपला. तो मुलांमध्ये रुजविला. पतीचे निधन, दिराचे निधन, मोठ्या मुलाचे, मुलीचे अन् सुनेचे आकस्मिक निधन, अशा अनेक संकटांना त्यांनी धिराने तोंड दिले. नातवंडांचे संगोपन केले.
गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे त्यांच्या मनात गोरगरीब, वंचित व पिडीत लोकांबद्दल आस्था होती. क्रिकेट सामने, सिनेमे पाहणे याची त्यांना आवड होती. बंधू भाऊसाहेब निंबाळकर हे उत्तम क्रिकेटपटू असल्याने प्रमिलादेवींनाही क्रिकेटची आवड होती. पृथ्वीराज पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय वाटचालीत त्यांचे संस्कार व शिकवण महत्वाची ठरली. वसंत कॉलनी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या