प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : युवा नेते प्रभाकर बाबा पाटील हे डोंगरसोनी येथे यात्रेनिमित्त उपस्थित होते.यात्रेतील कुस्ती मैदान संपल्यानंतर मणेराजुरीकडे जात असताना,सावळज गावातून बाहेर पडल्यानंतर अंजनी रोडवरील पेट्रोलपंपाजवळ त्यांना एक गंभीर अपघात झाल्याचे दिसून आले.
क्षणाचाही विलंब न करता प्रभाकर बाबांनी आपली गाडी थांबवली. परिस्थितीची गंभीरता ओळखून ते तात्काळ गाडीतून खाली उतरले. अपघातग्रस्त व्यक्तीला त्यांनी स्वतःच्या गाडीत बसवून वेध हॉस्पिटल, सावळज येथे तातडीने पाठवले. त्यानंतर इतक्यावर न थांबता, स्वतः मोटरसायकलवरून मागून हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथे उपचार सुरू आहेत की नाही, याची खातरजमा केली आणि उपस्थित मित्रांना व डॉक्टरांना योग्य व त्वरित उपचार करण्यास सांगितले.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण अशा प्रसंगी दुर्लक्ष करून पुढे निघून जातात. मात्र प्रभाकर बाबांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की नेतृत्व हे केवळ पदाने मोजले जात नाही, तर माणुसकीने ओळखले जाते. संकटात सापडलेल्या एका सामान्य व्यक्तीसाठी थांबून मदतीचा हात पुढे करणारा हा मोठेपणा, ही संवेदनशीलता आणि ही आपुलकी—हेच प्रभाकर बाबांचे खरे नेतृत्व आहे.
जनतेच्या सुख-दुःखात स्वतःला सहभागी करून घेणारे, गरजूंना मदतीसाठी सदैव तत्पर असलेले प्रभाकर बाबा पाटील हे केवळ युवा नेते नाहीत, तर समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. अशा कृतीतूनच खऱ्या अर्थाने नेतृत्व कसे असते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या