प्रतिष्ठा न्यूज/कोल्हापूर प्रतिनिधी :
शहाजी महाविद्यालयातील कॉमर्स विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त लघुनाट्य सादरीकरण तसेच “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने झाली. स्वागत व प्रास्ताविक कॉमर्स विभागप्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.
बी.कॉम. भाग तीनचा विद्यार्थी कु. आयुष्य गणमाळे याने आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनपट प्रभावीपणे उलगडून सांगितला. कु. फातिमा सय्यद हिने सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर कु. समीक्षा माने हिने विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन आत्मविश्वासाने संकटांना सामोरे जाण्याबाबत आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या डॉ. सी. के. पाटील यांनी आपल्या व्याख्यानात सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही किती उपयुक्त आहेत हे स्पष्ट केले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेतल्यास जीवनातील कोणत्याही संकटाला निर्भयपणे सामोरे जाता येते, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष व समाजसुधारणेतील योगदानाचा आढावा घेतला. या संघर्षातून आजच्या महिलांनी प्रेरणा घेऊन समाजपरिवर्तनासाठी पुढे यावे व समाजाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कॉमर्स विभागातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित लघुनाटिकेचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमास आयक्यूएसी समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे, प्रबंधक श्री. रविंद्र भोसले, अधीक्षक श्री. मनीष भोसले तसेच महाविद्यालयातील विविध विभागांतील प्राध्यापक, कॉमर्स विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. अस्मिता इनामदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. सायली पाटील यांनी मानले. या उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग बोंद्रे दादा यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या