प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : पर्यावरण संवर्धन व जनजागृतीसाठी गेली २९ वर्षे अखंडपणे कार्य करणाऱ्या सांगली येथील डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप या संस्थेतर्फे रविवार, २५ जानेवारी रोजी आमराई उद्यानात निसर्ग विषयक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला साडेचारशेहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बाल स्पर्धकांनी पर्यावरणाचे विविध प्रश्न व त्यावरील उपाय कागदावर प्रभावीपणे मांडले.
डॉल्फिनच्या वर्धापनदिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी डॉल्फिन ग्रुपच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा अमराईच्या निसर्गरम्य वातावरणात शालेय स्तरावर तीन गटांत घेण्यात आली.
तिसरी ते चौथी (लहान गट) – माझा आवडता प्राणी किंवा पक्षी, झाडे लावू झाडे जगवू, माझे निसर्गरम्य गाव
पाचवी ते सातवी (मध्यम गट) – प्रदूषण समस्या व उपाय, माझ्या कल्पनेतील सुंदर शहर किंवा गाव, आपली स्वच्छ कृष्णामाई
आठवी ते दहावी (मोठा गट) – प्लास्टिकच्या विळख्यात पृथ्वी, कृष्णामाईची स्वच्छता व आम्ही सांगलीकर, पर्यावरण संरक्षण : आपली जबाबदारी
प्रदूषण, कृष्णा नदीचे प्रदूषण, प्लास्टिकचा वाढता वापर, पर्यावरण संवर्धन व त्यावरील उपाययोजना अशा महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली चित्रे साकारली.
या स्पर्धेचे संयोजन ऋषिकेश ऐनापुरे, प्रवीण मगदूम, वंदना राजमाने, संस्थापक शशिकांत ऐनापुरे, स्मिता देसाई, पद्मजा पाटील, सचिन सुतार, सरिता पाटील, मेघा पाटील, आदिती कुंभोजकर, मनोजकुमार मुळीक, शिवाजी पाटील, मिलिंद सूर्यवंशी, अर्चना ऐनापुरे, सुशांत निकम, दिनेश पाटील, पुष्कर मगदूम, मुस्तफा मुजावर, नित्या पाटील, पूनम सूर्यवंशी, सतीश सूर्यवंशी व वरद राजमाने यांनी केले.
डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप ही संस्था गेली एकोणतीस वर्षे पर्यावरण संवर्धन व संतुलनाची गरज नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि भविष्यात त्यांच्याकडून निसर्ग रक्षणाचे कार्य घडावे, या उद्देशाने संस्थापक शशिकांत ऐनापुरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते.
वर्धापनदिन कार्यक्रमात प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकांना सन्मानचिन्ह व बक्षीस देण्यात येणार असून, सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या