सांगली प्रतिनिधी : नशामुक्त महाराष्ट्र अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत ९६५ ग्रॅम मेफॅड्रॉन (एमडी) पावडर जप्त केली. या अंमली पदार्थाची किंमत सुमारे ३८ लाख ६० हजार रुपये असून, मोबाईल फोन व अल्टो कारसह एकूण ४२ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विटा-तासगाव मार्गावरील एका मंगल कार्यालयासमोर ही कारवाई केली.
या प्रकरणी दत्तात्रय अंकुश पाखरे (वय ३२, रा. हिवरे, ता. खानापूर, जि. सांगली), अब्दुल निझार मोईद्दीन कुणी ऊर्फ आदिलखान (रा. कासारगोड, केरळ) आणि मोहम्मद शेमीर ऊर्फ समीर (रा. कासारगोड, केरळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात नशामुक्ती अभियानाच्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री, तस्करी, साठा व उत्पादन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, दत्तात्रय पाखरे हा एमडी विक्री करण्यासाठी विटा ते तासगाव मार्गावरील एका मंगल कार्यालयासमोर पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीची खात्री करून सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि त्यांच्या पथकाने पंच, वजनकाटा धारक व फोटोग्राफरसह घटनास्थळी सापळा रचला.
काही वेळाने मिळालेल्या वर्णनाप्रमाणे एक पांढरी चारचाकी तेथे येऊन थांबली. पोलिसांनी वाहनातील व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने आपले नाव दत्तात्रय अंकुश पाखरे असल्याचे सांगितले.
पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता ड्रायव्हर सीटखाली एका प्लॅस्टिकच्या पिशवीत फिकट पिवळसर रंगाची बारीक पावडर आढळली. तसेच वाहनाच्या डिक्कीमध्ये सीएनजी टाकीच्या खालील बाजूस पांढऱ्या व लाल रंगाच्या रिकाम्या कॅप्सूल असलेली प्लॅस्टिकची पिशवी आढळली. प्राथमिक तपासणीत पावडर अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. वजन केल्यानंतर त्याचे वजन ९६५ ग्रॅम भरले.
कतारला एमडी घेऊन जाण्याची होती योजना
पोलिसांच्या चौकशीत दत्तात्रय पाखरे याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा केरळमधील अब्दुल निझार मोईद्दीन कुणी ऊर्फ आदिलखान याच्याशी संपर्क होता. आदिलखानने त्याला कतार येथे बॅग घेऊन जाण्याचे काम दिल्याचे त्याने सांगितले.
यासाठी त्याच्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते दोहा, कतार असे विमानाचे तिकीटही बुक करण्यात आले होते. हे विमान तिकीट १३ ऑगस्ट २०२६ रोजीचे असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
मुंबई विमानतळावर आदिलखानच्या ओळखीचा मोहम्मद शेमीर ऊर्फ समीर याने पाखरेला बॅग दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, कतारला न जाता पाखरे मुंबई विमानतळावरून परत आपल्या गावी आला. त्यानंतर त्याने बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये लाल व पांढऱ्या रंगाच्या कॅप्सूल आढळल्या. या कॅप्सूल फोडल्यानंतर त्यामध्ये एमडी पावडर असल्याचे लक्षात आल्याने सर्व कॅप्सूल फोडून पावडर एकत्रित करून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवली आणि ती विक्री करण्याच्या उद्देशाने वाहनातून घेऊन आल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
आंतरराष्ट्रीय तस्करीचा धागा; आणखी आरोपींची शक्यता
या प्रकरणातील ‘बॅकवर्ड-फॉरवर्ड लिंकेज’ तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. एमडी पावडर कॅप्सूलमध्ये भरून ती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या तपासातून आणखी आरोपी निष्पन्न होण्याबरोबरच अंमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या कारवाईत ३८ लाख ६० हजार रुपये किमतीचे ९६५ ग्रॅम एमडी, सात हजार रुपयांचा रिअलमी मोबाईल, १५ हजार रुपयांचा वनप्लस मोबाईल आणि चार लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी अल्टो के-१० सीएनजी कार असा एकूण ४२ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे करीत आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
अंमली पदार्थांची विक्री, तस्करी, साठा किंवा उत्पादन करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती असल्यास ती तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जिल्हा नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस ठाण्यास द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
कारवाईतील अधिकारी व कर्मचारी
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, सहायक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, विटा पोलीस ठाणे आणि सांगली सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या