प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर, दि. 13 : भारत हा विविध धर्म, जाती आणि संस्कृतींच्या विविधतेने नटलेला देश असून ‘विविधतेत एकता’ हीच आपली ओळख आहे. जात-धर्माचे भेद विसरून सर्वांनी सौहार्दाने व बंधुभावाने जगणे ही आजची गरज आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही प्रत्येकाने ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन नगरविकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष तथा नगरसभेचे माजी अध्यक्ष परशुराम राजपूत यांनी केले
जिल्हा कन्नड साहित्य परिषदेच्या सभागृहात रविवारी जिल्हा, तालुका व शहर घटकांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध दत्तक व्याख्याने व चिंतनगोष्ठीचे उद्घाटन करून ते बोलत होते.
पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून उत्सवाचा आनंद घेतानाच जलस्रोत आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन राजपूत यांनी केले.
ज्ञकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेत्या श्रीदेवी उत्हासर होत्या. जिल्हा कन्नड साहित्य परिषद कोणत्याही जात-धर्मापुरती मर्यादित न राहता सर्वांना सामावून घेणारे व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. नवोदित प्रतिभावंत, युवा लेखक, कवी आणि कवयित्रींना संधी देऊन जिल्ह्यात सातत्याने साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय प्रगतीचा आधार सामाजिक सलोखा
‘सामरस्य व सौहार्दाचे महत्त्व’ या विषयावर विशेष व्याख्यान देताना वैद्य व साहित्यिक डॉ. अमीरुद्दीन काजी यांनी समाजात परस्पर विश्वास, प्रेम आणि बंधुभावाची भावना वाढीस लागणे आवश्यक असल्याचे सांगितले. नागरिकांनी एकजुटीने कार्य केल्यासच देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. वैयक्तिक जीवनापासून सामाजिक व राष्ट्रीय पातळीपर्यंत सामाजिक सलोखा आणि सौहार्दाला महत्त्वाचे स्थान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मातीच्या गणेशमूर्तींना प्राधान्य
‘पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व’ या विषयावर बोलताना विजयपूर तालुका कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा इतिहास संशोधक डॉ. आनंद कुलकर्णी यांनी शुद्ध माती व नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करणे ही पर्यावरणपूरक परंपरा असल्याचे सांगितले. रासायनिक रंग व घातक पदार्थांपासून तयार केलेल्या मूर्तींमुळे जलस्रोतांचे नुकसान होते. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास के. एस. हनमाणी, विजयलक्ष्मी हळकटी, अर्जुन शिरूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मेहताब कागवाड यांनी प्रार्थना केली. रियाज पिंजार यांनी स्वागत केले. डॉ. माधव गुडी यांनी प्रास्ताविक केले. यमनाप्पा पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर हासीमपीर वालिकार यांनी आभार मानले.
कार्यक्रमास कन्नड साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष हासीमपीर वालिकार, अल्लमप्रभू मल्लिकार्जुनमठ, श्रीकांत नाडगौड, सिद्धण्ण सातलगाव, मिलन होसकोटी, शांता विभूती, लता गुंडी, युवराज चोळके, बसवराज हिरेमठ, साक्षी गुर्जाळ, प्रदीप नायककोडी, पद्मावती उत्लासर, कीर्ती भजंत्री, आर. जी. बॅकोड, सिद्रामप्पा जंगमशेट्टी, शिवाजी मोरे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या