सांगली प्रतिनिधी : बदलत्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, सकारात्मक वृत्ती आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने विलिंग्डन महाविद्यालयाने ‘सॉफ्ट स्किल्स विकसन कार्यक्रम’ सुरू केला आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम राबविणारे विलिंग्डन महाविद्यालय हे जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे, यासाठी या अभ्यासक्रमामध्ये विविध जीवनोपयोगी आणि व्यावसायिक कौशल्यांवर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी, नेतृत्वगुण, वेळेचे नियोजन, सामाजिक भान, ताण-तणावांचे व्यवस्थापन तसेच भविष्यातील आयुष्याचे योग्य नियोजन करण्याची क्षमता विकसित करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याबरोबरच मिळालेली नोकरी टिकवून ठेवणे, कार्यक्षेत्रात प्रभावी संवाद साधणे, संघभावनेने काम करणे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यात यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास या अभ्यासक्रमातून केला जाणार आहे.
या उपक्रमासाठी कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन डॉ. विश्राम लोमटे यांनी विशेष प्रयत्न करून अभ्यासक्रमाच्या मंजुरीसाठी पुढाकार घेतला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे. तसेच या कोर्सच्या अंमलबजावणीसाठी FutureReady Skills या संस्थेसोबत महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव, उपप्राचार्य डॉ. रवींद्र कुलकर्णी, उपप्राचार्य शेळके आणि डॉ. नेहा जोशी यांनी विशेष पुढाकार घेतला. अनुराधा सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलचे संचालक डॉ. मिलिंद किल्लेदार यांनीही या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
यावेळी प्राचार्य डॉ. जाधव, ऑफिस सुप्रीटेंडंट पांडव, अॅडव्होकेट होमकर तसेच FutureReady Skills चे संचालक अतुल गावडे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना बदलत्या रोजगारविश्वासाठी सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा हा उपक्रम विलिंग्डन महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या