प्रतिष्ठा न्यूज : मिरज
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखू व माव्याची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी म्हैसाळ येथे कारवाई करत तिघांना अटक केली. या कारवाईत तयार मावा व विविध प्रकारचा सुगंधी तंबाखू असा एकूण २० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी म्हैसाळ येथील हॉटेल वैभवजवळील अविनाश पान शॉप येथे करण्यात आली.
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कोकाटे यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी अधिकारी व अंमलदारांना हद्दीत गुटखा, सुगंधी तंबाखूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पान शॉपवर छापा; सुगंधी तंबाखू व मावा जप्त
दि. १८ सप्टेंबर रोजी मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक म्हैसाळ परिसरात पेट्रोलिंग करीत असताना सहा. पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ, पोलीस अंमलदार आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला अविनाश पान शॉप येथे सुगंधी तंबाखू व माव्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीची खात्री करून वरिष्ठांच्या आदेशाने अन्न व औषध प्रशासन, सांगलीचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल अरुणराव पवार व प्रणव जिनगर यांना पाचारण करण्यात आले. दोन पंचांच्या उपस्थितीत पान शॉपची झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू व मावा आढळून आला.
अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार यांनी सदर मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच रासायनिक तपासणीसाठी नमुने घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
२० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल
कारवाईमध्ये खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला—
- तयार मावा – ५०० ग्रॅम, अंदाजे किंमत ५०० रुपये.
- सुगंधी तंबाखू – ५०० ग्रॅम वजनाचे २० सीलबंद विनालेबल पारदर्शक पॅकेट, एकूण १० किलो, किंमत १० हजार रुपये.
- काळ्या रंगाच्या पॅकेटमधील सुगंधी तंबाखू – ५०० ग्रॅम वजनाचे ८ पॅकेट, एकूण ४ किलो, किंमत ४ हजार रुपये.
- लाल रंगाच्या पॅकेटमधील सुगंधी तंबाखू – ५०० ग्रॅम वजनाचे १२ पॅकेट, एकूण ६ किलो, किंमत ६ हजार रुपये.
अशाप्रकारे एकूण २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिघांना अटक; न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी तानाजी अन्नासो दबडे (वय ३६, रा. कागवाड बसवनगर, ता. कागवाड, जि. बेळगाव), अविनाश अशोक शिंदे (वय ४८, रा. म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली) आणि विशाल शशिकांत पिंपळे (वय ४४, रा. इंचलकर्जी, ता. हातकणगले, जि. कोल्हापूर) यांना दि. १८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेला सुगंधी तंबाखू कर्नाटकातून विकत घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील मुद्देमालाची पुढील तपासणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले असून, संबंधित आरोपींविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भाग ५ गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८३/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम २२३, १२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश साळुंखे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रविण यादव, पोहेकॉ. मधुकर मदवान, राजेंद्र बाबर, अमोल ढोले, पोलीस कॉन्स्टेबल वसंत कांबळे, विनायक कडाळे, महिला पोलीस नायक सविता कसबे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार व प्रणव जिनगर यांच्या पथकाने केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या