प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्द,मेहनत आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर वंजारवाडीच्या कन्या सानिका खरमाटे हिने फुटबॉल क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य महिला फुटबॉल संघात आर.आर. पाटील स्पोर्ट्स क्लब,तासगावची सानिका खरमाटे हिची मुख्य गोलकीपर म्हणून निवड झाली आहे.त्यामुळे तासगावच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.राष्ट्रीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे महाराष्ट्रातील महिला फुटबॉलपटूंसाठी विशेष निवड चाचणी व सराव शिबिर घेण्यात आले.संपूर्ण राज्यातून निवड झालेल्या ४० गुणवंत खेळाडूंमध्ये आर.आर.पाटील स्पोर्ट्स क्लबच्या सानिका खरमाटे आणि सृष्टी माने यांचा समावेश होता.शिबिरातील कठोर सराव,कौशल्य चाचण्या आणि कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राच्या मुख्य संघासाठी अंतिम २० खेळाडूंची निवड करण्यात आली.या निवड प्रक्रियेत सानिकाने आपल्या उत्कृष्ट गोलकीपिंग,चपळता,प्रसंगावधान आणि प्रभावी बचावाच्या जोरावर आपले स्थान पक्के केले.विशेष म्हणजे,महाराष्ट्राच्या मुख्य गोलकीपरची जबाबदारी सानिकावर सोपविण्यात आली आहे.ग्रामीण भागातून आलेल्या खेळाडूने थेट राज्याच्या मुख्य संघात महत्त्वाची जबाबदारी मिळविल्याने तिच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे.सानिकाच्या या यशामागे आमदार रोहित पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हाध्यक्ष जग्गू सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष अमित पवार, क्लबचे अध्यक्ष सुदाम माळी, हेड कोच बाळासाहेब माळी, माजी नगरसेवक बाळासाहेब सावंत, तसेच खंडू कदम आणि पवन जाधव यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.वंजारवाडीच्या मातीतून सुरू झालेला सानिकाचा फुटबॉल प्रवास आता राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचला आहे.तिच्या या निवडीबद्दल तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, नागरिक आणि आर.आर.पाटील स्पोर्ट्स क्लबच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आंध्रप्रदेशातील राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सानिका महाराष्ट्राच्या गोलपोस्टची भक्कम जबाबदारी सांभाळत संघाला विजेतेपद मिळवून देईल,असा विश्वास क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या