प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:जैववैद्यकीय कचरा संकलनाच्या नावाखाली खासगी एजन्सीकडून करण्यात आलेली मनमानी दरवाढ आणि शासनाच्या दवाखाना तपासणी मोहिमेदरम्यान नोंदणीकृत डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या कथित अपमानास्पद वागणुकीविरोधात तासगाव तालुक्यातील जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर आक्रमक झाले आहेत.या दोन्ही प्रश्नांवर तातडीने तोडगा न काढल्यास सर्व जीपी दवाखाने बंद करून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी निवेदनाद्वारे दिला आहे.याबाबत तासगाव तालुक्यातील जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह तहसीलदारांकडे निवेदन सादर केले आहे.
*₹३,२०० वरून थेट ₹१२ हजारांची मागणी*
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार,सांगली जिल्ह्यात जैववैद्यकीय कचरा संकलन करणाऱ्या एजन्सीकडून मागील वर्षी प्रत्येक जनरल प्रॅक्टिशनरकडून सुमारे ₹३,२०० वार्षिक शुल्क आकारले जात होते. यंदा मात्र अचानक हे शुल्क तब्बल ₹१२ हजारांपर्यंत वाढविण्यात आले आहे.या दरवाढीबाबत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली असता,चालू दरात केवळ १० टक्के वाढ करण्याचे निर्देश देण्यात आल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.मात्र,संबंधित एजन्सीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची दखल न घेता स्वतःच्या दरावर ठाम राहत,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) नियमांचा धाक दाखवून डॉक्टरांवर दबाव आणल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
*जिल्ह्याबाहेरील एजन्सींना परवानगी द्या*
जिल्ह्याबाहेरील काही एजन्सी यापेक्षा कमी दरात जैववैद्यकीय कचरा संकलन करण्यास तयार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकाच एजन्सीकडे जैववैद्यकीय कचरा देण्याची सक्तीची अट रद्द करून स्पर्धात्मक दरांचा लाभ डॉक्टरांना मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
*तपासणी मोहिमेत ‘शिपाईराजा’चा आरोप*
दरम्यान, १० ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान सुरू असलेल्या दवाखाना तपासणी मोहिमेवरूनही डॉक्टरांमध्ये नाराजी आहे. तपासणीदरम्यान ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी तत्त्वावरील शिपाईच डॉक्टरांना आदेश देत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
‘लूज औषधे का ठेवली?’, ‘एमआरना फोन का करता?’, ‘आजच सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ग्रामीण रुग्णालयात आणून द्या’,अशा प्रकारे डॉक्टरांशी बोलून त्यांना दबावाखाली आणले जात असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.या कथित ‘शिपाईराजा’मागे कोणाचा वरदहस्त आहे,याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
*मोठ्या हॉस्पिटलचे नियम छोट्या दवाखान्यांनाही तंतोतंत लागू?*
मोठ्या रुग्णालयांसाठी असलेले सर्व नियम ग्रामीण भागातील छोट्या जनरल प्रॅक्टिस दवाखान्यांनाही तंतोतंत लागू आहेत का,याबाबत स्पष्टता करण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे.नियमांची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांना नियमावलीची माहिती देण्यात यावी,तसेच आवश्यक पूर्ततेसाठी ठराविक कालावधी देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.डॉक्टरांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
*‘रुग्णांवर उपचार करायचे की कागदपत्रे पूर्ण करायची?’*
तालुक्यातील अनेक नोंदणीकृत जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर सध्या प्रचंड मानसिक दबावाखाली काम करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी असताना रुग्णांवर उपचार करायचे की तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रांची तातडीने पूर्तता करीत बसायचे,असा सवाल डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.विशेष म्हणजे तालुक्यात कथित बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी नोंदणीकृत डॉक्टरांनाच विनाकारण मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याची नाराजीही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.प्रशासनाने दोन्ही प्रश्नांवर तातडीने हस्तक्षेप करून डॉक्टरांना न्याय द्यावा; अन्यथा जीपी दवाखाने बंद करून आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय उरणार नाही,असा स्पष्ट इशारा तासगाव तालुक्यातील जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या