मिरज : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट संचलित डी.एड्. कॉलेज (इंग्लिश मिडियम), मिरज येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या सौ. संगीता संजय ओक तसेच मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व रोपट्यास पाणी घालून करण्यात आली. ‘।। ज्ञानमेव गुरुः ।।’ या ब्रीदवाक्याला अनुसरून गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थिनी सृष्टी पुकाळे व झीनत खतीब यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मेघा चव्हाण हिने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ख्रिस्टीना मार्टिन यांच्या हस्ते मान्यवर तसेच शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना जैनब मुलानी हिने मराठीतून, तर नाझ मगदूम हिने इंग्रजीतून प्रभावी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. संगीता ओक यांनी शिक्षकांचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आणि भवितव्य घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, भावी शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता समर्पण, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षा ख्रिस्टीना मार्टिन यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थिनींनी केलेल्या उत्कृष्ट नियोजन व आयोजनाचे कौतुक केले.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, कार्यकारी विश्वस्त अॅड. विरेंद्रसिंह पाटील व कॅम्पस समन्वयक डॉ. सतीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. बी.एड्. विभागाचे प्राचार्य डॉ. बी. एन. कराळे यांच्यासह डी.एड्. व बी.एड्. विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरहीन पटेल हिने केले, तर ताहजीबा मकानदार हिने आभार मानले. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिक्षक दिनाचा सोहळा संस्मरणीय ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या