प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
कलबुरगी, दि. १० : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या अर्थसाहाय्य योजना २०२५–२६ अंतर्गत कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, कलबुरगी आणि सन्मती महिला मंडळ, कलबुरगी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला प्रसिद्ध एकपात्री मराठी प्रयोग ‘कुटुंब आख्यान’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक व ज्येष्ठ नाट्यकलाकार डॉ. अनुराधा पत्की यांच्या दमदार, सहजसुंदर आणि बहारदार अभिनयाने उपस्थित रसिक महिला अक्षरशः मंत्रमुग्ध झाल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुरय्या रे. स्वामी यांनी प्रास्ताविकातून परिषदेच्या कार्याची व उद्दिष्टांची माहिती दिली. मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनाबरोबरच समाजातील विविध घटकांना साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांशी जोडणे, नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि मराठीचा प्रचार-प्रसार करणे हे परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मेघा राहुल पाडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी सन्मती महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह साहित्यप्रेमी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
‘कुटुंब आख्यान’ या एकपात्री प्रयोगातून डॉ. अनुराधा पत्की यांनी कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध, स्त्रीचे भावविश्व, दैनंदिन जीवनातील विनोद आणि कौटुंबिक प्रसंग यांचे अत्यंत प्रभावी आणि विनोदी पद्धतीने चित्रण केले. विविध व्यक्तिरेखा, आवाजातील चढ-उतार, देहबोली, संवादफेक आणि अभिनयातील सहजता यामुळे प्रयोगाला विशेष रंगत आली. त्यांच्या अभिनयातील विनोदाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. अनेक प्रसंगांवर हास्याचे फवारे उडत असतानाच काही प्रसंगांनी अंतर्मुखही केले.
नाट्यप्रयोग एकपात्री असूनही रंगमंचावर अनेक व्यक्तिरेखा जिवंत करण्याची डॉ. पत्की यांची अभिनयकिमया रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरली.
प्रयोगाच्या अखेरीस उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रभाकर सलगरे, मिलिंद उमाळकर, प्रमोद शहा, सुखदा शहा आणि सन्मती महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली शहा, कार्यवाह नंदा शहा तसेच अंकुश शहा व इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महिला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या